प्रेयसीसोबत आत्महत्येचा कट; कारमध्ये स्फोट घडवून प्रियकराचा अंत!

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
तुमकुरू,
plot-to-commit-suicide-with-ex-girlfriend : कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातून एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एक्स-गर्लफ्रेंडसोबत (माजी प्रेयसी) आत्महत्येचा कट रचणाऱ्या एका तरुणाने टॅक्सीतच बॉम्बस्फोट घडवून आणला. या भीषण स्फोटात प्रियकराचा जागीच जळून मृत्यू झाला, तर प्रेयसीने ऐनवेळी कारमधून उडी मारल्याने ती थोडक्यात वाचली. या घटनेत टॅक्सी चालकही गंभीर जखमी झाला असून, दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागेंद्रन असे मृत तरुणाचे नाव आहे.
 
 
plot-to-commit-suicide-with-ex-girlfriend
 
 
 
वाद आणि अपहरणातून घडले नाट्य
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेंद्रन आणि पीडित मुलगी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. वादाला कंटाळून मुलीने नागेंद्नला सोशल मीडियावर ब्लॉक केले होते. याचा राग मनात धरून शनिवारी सकाळी नागेंद्रनने तिच्या घरातून तिचे जबरदस्तीने अपहरण केले आणि एका भाड्याच्या टॅक्सीतून तिला शहराबाहेर घेऊन जाऊ लागला. मुलगी घरात न दिसल्याने तिच्या पालकांनी आधीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
 
हायवेवर कारमध्ये घडवला स्फोट
 
सिरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर टॅक्सी पोहोचली असता नागेंद्रनने मुलीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून टॅक्सी चालकाने तात्काळ गाडी थांबवली. याचाच फायदा घेत मुलीने प्रसंगावधान राखून कारचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारली. चालकानेही प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर उडी घेतली. मात्र, ते दोघे बाहेर पडताच नागेंद्रनने आपल्यासोबत आणलेली स्फोटके पेटवून कारमध्ये मोठा स्फोट घडवला.
 
क्षणार्धात कारने पेट घेतला आणि नागेंद्रनचा गाडीतच जळून मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नागेंद्रनकडे ही स्फोटके कुठून आली, याचा शोध घेतला जात आहे.