नव्या गुप्तचर विभागाचे मुख्य मूळ हिंगणघाटात!

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
सतीश वखरे
 
हिंगणघाट,
mahesh dixti गुप्तचर विभागाचे नव्याने जबाबदारी स्वीकारलेले डॉ. महेश शांताराम दीक्षित हे मुळचे हिंगणघाटकर आहेत. मोठमोठ्या पदावर हिंगणघाटकर पोहोचले आहेत. महेश यांचे आजोबा डॉ. दिनकर मुरलीधर दीक्षित हे हिंगणघाट येथील वेदशास्त्र संपन्न असलेल्या जुन्या वस्तीतील दीक्षित परिवारातील होते.
 

mahesh dixti, ips, intelligence bureau, 
महेश दीक्षित यांच्या आजोबांचे प्राथमिक व शालेय शिक्षण हिंगणघाट येथे झाले. पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी ते नागपूरला गेले व तेथेच स्थायिक झाले. विदर्भातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रसिद्ध विचारवंत मा. गो. वैद्य यांचे बहीण जावाई असलेले स्व. प्रभाकरशास्त्री दीक्षित यांचे ते मोठे बंधू होत. डॉ. दिनकर दीक्षित यांचा हिंगणघाट सोबत दीर्घकाळपर्यंत संपर्क होता. त्यांचे सुपुत्र डॉ. शांताराम हे सुद्धा डॉटर झाले. त्यानंतर ते नाशिक येथे स्थायिक झाले.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. महेश शांताराम दीक्षित यांची देशातील सर्वोच्च अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने त्यांच्या नियुतीला मंजुरी दिली असून विद्यमान संचालकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पदभार स्वीकारणार आहेत.
डॉ. दीक्षित यांचे मूळ घराणे हिंगणघाटचे असून त्यांचे वडील डॉ. शांताराम नाशिक येथे स्थायिक झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉ. महेश यांचे प्राथमिक शिक्षण रंगूबाई जुन्नरे हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण आरवायके कॉलेज येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एम.डी. (मानसोपचारशास्त्र) ही पदवी संपादन केली. डॉटर म्हणून उज्ज्वल कारकीर्द करण्याची संधी असतानाही त्यांनी नागरी सेवांचा मार्ग निवडला आणि भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला.
आंध्रप्रदेश केडरचे अधिकारी असलेल्या डॉ. दीक्षित यांनी आपल्या सेवाकाळात नक्षलवादग्रस्त भागात अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांची नियुक्ती गुप्तचर विभागात झाली. काश्मीरमध्ये तब्बल आठ वर्षे गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच नागालॅण्डसह ईशान्य भारतातील संवेदनशील भागातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय, रशियामध्येही दोन वर्षे त्यांची नियुक्ती होती.
कर्तव्यकठोर आणि अभ्यासू अधिकारी अशी डॉ. महेश दीक्षित यांची ओळख असून मूळ हिंगणघाटकर असलेल्या त्यांची या पदावरील नियुती अभिमानास्पद आहे.