‘मन की बात’मध्ये नांदेडच्या पेठकर कुटुंबाचे पंतप्रधानांकडून कौतुक

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
mann ki baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३५ व्या भागातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबाच्या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. वाढदिवस आणि लग्नसोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता समाजाच्या आनंदाचे उत्सव बनले असल्याचे सांगताना त्यांनी नांदेडमधील पेठकर कुटुंबाने केलेल्या उपक्रमाचा उल्लेख केला.
 

mann ki baat, narendra modi, pethkar family, 
नांदेडमधील बहादूरपुरा गावात राहणाऱ्या पेठकर कुटुंबाने आपल्या घरातील विवाहसोहळ्याच्या निमित्ताने गावातील सुमारे साडेतीन हजार नागरिकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला एक लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले. कठीण प्रसंगी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. अपघातानंतर अनेक कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि अशा वेळी छोट्याशा मदतीचाही मोठा आधार ठरू शकतो, अशी भावना या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
याच कार्यक्रमातmann ki baat  पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशवासीयांना केलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला केवळ पाठिंबा दिला नाही, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली आहे. अनेक कुटुंबांनी आपल्या विवाहसमारंभात नव्याने सोने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला असून गरज भासल्यास जुन्या सोन्याचे पुनर्वापर करून त्यापासून नवीन दागिने तयार करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.तसेच अनेक नागरिकांनी कार पूलिंगचे अनुभवही त्यांच्याशी शेअर केले असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच दिशेने प्रवास करणारे लोक आता वेगवेगळ्या वाहनांऐवजी एकत्र प्रवास करत असल्यामुळे इंधनाची बचत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय नागरिक सध्याच्या संकटाचा एकजुटीने सामना करत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

सकारात्मक प्रतिसाद..
पंतप्रधानांनी सांगितले की, शक्य तितक्या काळासाठी सोने खरेदी टाळण्याचे, परदेशात सुट्ट्या घालविण्याऐवजी देशांतर्गत पर्यायांचा विचार करण्याचे, कार पूलिंगला प्रोत्साहन देण्याचे तसेच शेतकऱ्यांनी रसायनमुक्त शेती आणि नैसर्गिक खतांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी यापूर्वी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
देशाच्या संरक्षण mann ki baat क्षमतेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, समुद्रापासून आकाशापर्यंत भारत सुरक्षित आहे. नुकत्याच यशस्वी चाचणी झालेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचाही त्यांनी उल्लेख केला. जून महिन्यात विमाननिर्मिती क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाल्याचे सांगताना ‘मेड इन इंडिया’ अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या C-295 विमानाने पहिली यशस्वी उड्डाण चाचणी पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या अशा ४० विमानांची निर्मिती भारतातच सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अलीकडेच कोलकाता येथे नौदलाशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे सांगताना त्यांनी आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय या युद्धनौकांचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आल्याचा उल्लेख केला. या जहाजांचे डिझाइन आणि उत्पादन पूर्णपणे स्वदेशी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आंतरराष्ट्रीय mann ki baat योग दिनाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. यंदा जगभरातील २,५०० हून अधिक ठिकाणी विविध प्रकारचे योग कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अहमदाबाद येथे पार पडलेल्या ‘विश्व योगासन चॅम्पियनशिप’चीही त्यांनी विशेष दखल घेतली. या स्पर्धेत भारताने ११४ पदके जिंकली असून त्यापैकी १०२ सुवर्णपदके मिळवत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावल्याचे त्यांनी नमूद केले.