गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली :
Maoist arms factory गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांविरोधातील कारवायांना मोठे यश मिळाले असून, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी गुप्तपणे उभारलेला शस्त्रनिर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त पथकाने ही धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मितीचे साहित्य हस्तगत केले आणि ते घटनास्थळीच नष्ट केले.
पोलीस दलाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 26 जून रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता यांच्या सहा तुकड्या, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झाले होते. 27 जून रोजी बालबेडा जंगल परिसरात घेराबंदी करून सखोल तपासणी करण्यात आली. त्यावेळी माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य आढळून आले. यामध्ये सुमारे पाच ते सहा टन वजनाचे एक लेथ मशीन, 150 क्लेमोर व बीजीएल पाईप्स, 220 बारा बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच इतर साहित्याचा समावेश होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गम जंगलाचा फायदा घेत माओवादी अशा प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्य तयार करून जमिनीत लपवून ठेवत असत. नक्षल सप्ताह, निवडणुका किंवा सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापूर्वी 23 मे आणि 27 मे रोजीही अशाच प्रकारच्या कारवायांमध्ये माओवादी साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे माओवाद्यांच्या शस्त्रपुरवठा साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यातील माओवादी चळवळ कमकुवत करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
ही मोहीम अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, इंटेलिजन्स सेल, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या धाडसी कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी विशेष कौतुक केले.