बीएसएनएल सेवा ठप्प
धारणी,
Melghat: BSNL services disrupted तालुक्यातील अतिदुर्गम रेल्वे धूळघाट परिसरात आठवडाभरापासून बीएसएनएलची मुख्य वायर तुटल्यामुळे मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वे धूळघाटसह परिसरातील सुमारे २० गावांतील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यांचा जगाशी संपर्क तुटला आहे.
संपर्क व्यवस्था कोलमडल्याने शासकीय कार्यालये, विद्यार्थी, व्यापारी तसेच ऑनलाईन व्यवहार करणारे नागरिक अडचणीत आले आहेत. विशेषतः रेल्वे धूळघाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व ऑनलाईन कामकाज पूर्णपणे बंद पडले असून आरोग्य सेवेवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. रुग्णांची ऑनलाईन नोंदणी, विविध आरोग्य योजनांचे पोर्टलवरील अहवाल, औषध साठ्याची माहिती, लसीकरणाची ऑनलाईन नोंद तसेच इतर शासकीय आरोग्य सेवा इंटरनेटअभावी रखडल्या आहेत. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, डॉक्टर किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत असून अनेकांना आवश्यक माहिती व शासकीय सेवा वेळेवर मिळत नाहीत.स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही बीएसएनएल विभागाकडून अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे. तुटलेली वायर बदलून नवीन केबल तातडीने टाकावी आणि मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रेल्वे धूळघाट परिसरात बीएसएनएल हीच प्रमुख दूरसंचार सेवा असल्याने तिच्यावर हजारो नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन सेवा पूर्ववत करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने वरिष्ठ प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्याबाबतचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.