कानपुर,
minor girl subjected to brutal उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला तब्बल सहा दिवस कैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप असून, या काळात तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मैत्रीचे आमिष दाखवत आरोपींनी प्रथम मुलीचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिचे अपहरण करून तिला बंदिवान बनवले.
मिळालेल्या माहितीनुसार, अरमान नावाच्या मुख्य आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला बेकनगंज परिसरातील एका घरात नेले. तेथे तिला सहा दिवस डांबून ठेवण्यात आले. या काळात मुलीवर सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिला धार्मिक विधी पाळण्यास भाग पाडण्यात आले आणि तिच्या इच्छेविरुद्ध विविध गोष्टी करण्यास सक्ती करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
पीडितेने आरोप केला आहे की, विरोध केल्यानंतर आरोपींकडून तिच्यावर अधिक क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. गरम चिमट्याने भाजणे, धमक्या देणे तसेच कोऱ्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी दबाव आणणे, असे गंभीर आरोपही समोर आले आहेत. या सर्व प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी पोहोचली आणि तिने संपूर्ण प्रकार कुटुंबीयांसमोर कथन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कुटुंबीयांनी तातडीने रावतपूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. या प्रकरणात मुख्य आरोपी अरमानसह चार जणांना अटक करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या जबाबाच्या आधारे विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.