सायरनच्या गजरात इतिहास

अग्निशमन दलाला मिळाली पहिली महिला फायर इंजिन ड्रायव्हर

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
मुंबई
pallavi patil मुंबई अग्निशमन दलाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेने फायर इंजिन चालकाची जबाबदारी स्वीकारत नवा इतिहास रचला आहे. २९ वर्षीय पल्लवी पाटील यांनी मुंबई अग्निशमन दलातील पहिल्या महिला फायर इंजिन ड्रायव्हर होण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांचा फायर इंजिन चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 

mumbai fire brigade, pallavi patil first female fire engine driver, 
पल्लवी पाटील यांच्या कुटुंबाची अग्निशमन सेवेशी आधीपासूनच जवळची नाळ जोडलेली आहे. त्यांचे भाऊ अग्निशमन दलात कार्यरत असून, वडिलांच्या प्रेरणेतून त्यांनीही या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यांनी या पदासाठी आवश्यक असलेली कठीण परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. त्यानंतर आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबई अग्निशमन दलात प्रवेश केला.
गेली आठ वर्षे पल्लवी या pallavi patil  फायरफायटर म्हणून कार्यरत होत्या. या कालावधीनंतर त्यांनी फायर इंजिन चालविण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले. विभागीय परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर फायर इंजिन चालकाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. आतापर्यंत त्यांनी तीन मोठ्या आगीच्या घटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातील वाहतुकीतून अवजड फायर इंजिन चालविणे हे मोठे आव्हान मानले जाते. त्याचबरोबर घटनास्थळी पाण्याचा दाब नियंत्रित ठेवण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असते. पल्लवी यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
पल्लवी यांना सहा वर्षांचा pallavi patil  मुलगा असून, त्यांचे पतीदेखील फायर इंजिन ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. मुलाची काळजी घेता यावी यासाठी हे दाम्पत्य आपल्या ड्युटीच्या वेळा परस्परांमध्ये समन्वयाने ठरवते. कुटुंब आणि कर्तव्य यांचा योग्य ताळमेळ साधत त्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अग्निशमन दलाची वर्दी परिधान केल्यानंतर लोकांचे प्राण वाचविणे हेच आपले सर्वोच्च ध्येय असल्याचे पल्लवी अभिमानाने सांगतात.दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी ‘नारी शक्तीला सलाम’ अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले असून, हीच खरी महिलांची ताकद असल्याचे मत व्यक्त केले आहे. अनेकांनी पल्लवी यांना प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे म्हटले आहे, तर एका नेटकऱ्याने हा क्षण खरोखरच अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पल्लवी पाटील यांच्या जिद्द, धैर्य आणि कर्तृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.