एनएनटीआरचे मुरदोली पर्यटन प्रवेशद्वार ‘बेवारस’ !

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
- नियोजनाचा अभाव, कर्मचारी व सफारी वाहने बेपत्ता
प्रमोद नागनाथे
 
गोंदिया, 
Murdoli Tourist Gate of NNTR नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर)च्या बफर झोनमधील मुरदोली पर्यटन प्रवेशद्वाराचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतर दिड महिन्याच्या कालावधीतच या प्रवेशद्वारावरील नियोजनाचा अभाव दिसू लागला आहे. वर्षभर व रात्रीपर्यंत सफारीचा आनंद घेता येणार असल्याचे सांगत या प्रवेश द्वाराला सुरुवात करण्यात आली असली तरी रविवारी 28 जून रोजी तरी ऐन सफारीच्या वेळेवर या प्रवेश द्वारासह बुकींग कार्यालयाला कुलूप व कार्यरत कर्मचार्‍यांसह सफारीची वाहने बेपत्ता असल्याचे दिसून आले. त्यामुळे एनएनटीआरच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
 NNTR
 
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, पर्यटनाला चालना मिळणार असा मोठा गाजावाजा करून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुरदोली पर्यटन गेट सुरु करण्यात आले. त्यात उद्घाटनाच्या दिवशीच पर्यटकांना चक्क चार वाघांचे दर्शन झाल्याने आपसूकच या प्रवेशद्वाराला प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यटंकाचा ओढा या प्रवेशद्वारावर दिसून आला. दरम्यान, पर्यटकांच्या सोयीसाठी प्रवेशद्वाराजवळ स्पॉट बुकिंग कार्यालय उभारण्यात आले. मात्र, आजघडीला संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून रविवारी येथील प्रवेशद्वार व बुकींग कार्यालयाला कुलूप लागल्याचे दिसूल तर कार्यरत एकही कर्मचारी कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळले. विशेष म्हणजे, याच परिसरात चार ते पाच वाघांचा अधिवास असताना प्रवेशद्वारच्या शेजारीच आत प्रवेश करण्यासाठी पायवाट सोडण्यात आली आहे. त्यामुळे या पायवाटेतून कुणीही दुचाकीने अनधिकृतपणे बफर झोनमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना एकही कर्मचारी कर्तव्यावर नसने सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर मुद्दा ठरत आहे.
रविवारी कुलूप?
शनिवार व रविवारी पर्यटकांची संख्या अधिक राहत असल्याने एनएनटीआरने या दोन दिवसांसाठी सफारी शुल्क 4,500 रुपये, तर इतर दिवशी 4,000 रुपये निश्चित केले आहे. मात्र, ऐन रविवारीच या पर्यटन प्रवेशद्वारसह स्पॉट बुकिंग कार्यालयाला कुलूप दिसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

सफारीची वेळ सकाळी 5.30 ते 9 आणि दुपारी 3 ते 6 अशी आहे. त्यामुळे इतरवेळी कर्मचारी राहत नाही. तर प्रवेश द्वाराच्या बाजूला रोपवाटिकातील मजूरांना ये- जा करण्यासाठी छोटी पायवाट देण्यात आली असून पर्यटक किंवा इतर बाहेरील व्यक्तीला परवानगी शिवाय आत जाता येत नाही. तसे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- प्रितमसींग कोडापे
उपसंचालक, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखिव प्रकल्प