ब्लॉक करताच पेटला संताप अपहरणानंतर कार झाली 'अग्निकुंड'

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
तुमकूर
outrage erupts after blockade कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाचा अत्यंत धक्कादायक शेवट समोर आला आहे. ब्रेकअपनंतर संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. या प्रवासादरम्यान त्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि अखेर महामार्गावर कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला.
 
 
outrage erupts after blockade
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख नागेंद्र (वय ३०) अशी झाली असून तो मूळचा अंकोला येथील रहिवासी होता. सध्या तो बेंगळुरू येथे राहत होता. संबंधित तरुणी ही बंगळुरूमधील संजय गांधी रुग्णालय येथे ओटी टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता आणि अखेर तरुणीने नागेंद्रचा संपर्क पूर्णपणे बंद केला होता. शनिवारी सकाळी नागेंद्र थेट तरुणीच्या राहत्या घरी पोहोचला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने तरुणीला जबरदस्तीने कॅबमध्ये बसवले आणि अंकोलाच्या दिशेने निघाला. या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तातडीने अपहरणाची तक्रार दाखल केली. प्रवासादरम्यान नागेंद्रने तरुणीला वारंवार धमकावत “आधी तुला संपवेन आणि नंतर स्वतःलाही” असे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. एवढेच नव्हे तर त्याच्याकडे संशयास्पद स्फोटक साहित्यही असल्याचा पोलिसांना संशय आहे.
 
 
सिरा तालुक्यातील जोगीहळ्ळी परिसरात पोहोचताच परिस्थिती आणखी गंभीर झाली. नागेंद्रने तरुणीवर चाकूने हल्ला केला. प्रसंगावधान राखत चालकाने वाहन थांबवले. त्याच क्षणी तरुणीने कारचा दरवाजा उघडून बाहेर उडी मारली. काही क्षणांतच कारमध्ये जोरदार स्फोट झाला आणि वाहनाला भीषण आग लागली. या स्फोटात नागेंद्र कारमधून बाहेर पडू शकला नाही आणि जागीच होरपळून मृत्यू झाला. तरुणी आणि कॅब चालक दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून स्फोटकासारखे साहित्य जप्त केले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, वापरण्यात आलेले साहित्य कोणते होते आणि ते आरोपीकडे कसे आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही घटना प्रेमसंबंधातील वादातून घडल्याचे स्पष्ट होत असून संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.