सेलू,
pandharpur wari,टाळ मृदुंगाचा निनाद, हातात भगव्या पताका, डोयावर तुळशी वृंदावन, अन् मुखातून माऊली... माऊलीचे नामजप... विठू नामाचा गजर करीत घोराड येथील वारकरी पायदळ दिंडीत सामील होऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.
शुक्रवारी या दिंडीने गावातील प्रमुख मार्गाने प्रदक्षिणा करून निघत नाही तोच धरती मातेच्या ओढीनं आलेल्या पावसात विठ्ठलाच्या दरबारी जाणारे वारकरी ओलेचिंब होत भवानी मंदिरात पोहोचले. त्या ठिकाणी दिंडीने मुकाम केला. दिंडी शनिवारी सकाळी ९ वाजता भवानी मंदिरातून केजाजी महाराजांचा जयघोष करीत सेलू मार्गे मार्गस्थ झाली. बैल जोडीवर असणारा रथ हा सावंगी येथील गणेश मंदिरापर्यंत नेण्यात आला. तेथून तो रथ वारकरी ढकलत पंढरपूरपर्यंत नेणार आहेत. हरिदास महाराज महाकाळकर या दिंडीचे चालक असून पहिला मुकाम सावंगी मेघे येथे झाला असून रविवारी दिंडी देवळी मार्गे कळंबपर्यंत पोहचणार आहे.
या दिंडीतील वारकरी उन्ह, वारा, पाऊस काही असो पायदळ चालत विठ्ठल दर्शनाची ओढ पाहता याचि देही याची डोळा, प्रत्यक्ष दर्शन घेऊन गुरूपौर्णिमा झाल्यानंतर परतीचा प्रवास करणार आहेत. आता याच घोराड येथून दुसरी दिंडी ५ जुलै रोजी निघणार असून या दिंडीचे चालक नरेश महाराज पाटील आहे. ही दिंडी पुरुषोत्तम गुजरकर यांच्या नेतृत्त्वात निघणार आहे.