PM मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान!

आतापर्यंत ३४ देशांकडून गौरव!

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
व्हिक्टोरिया (सेशेल्स),
pm-modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रविवारी (२८ जून) पंतप्रधान मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'गार्डियन ऑफ ब्लू होरायझन' प्रदान करून गौरविण्यात आले. पर्यावरण रक्षण, हवामान बदलाचा सामना आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय नेतृत्वासाठी हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. यासह पंतप्रधान मोदी यांना आतापर्यंत जगातील तब्बल ३४ देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाले आहेत.
 
 
PM MODI 
 
 
'संधींचा महासागर' बनवूया: पंतप्रधान मोदी
 
 
तीन दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींचे राजधानी व्हिक्टोरिया येथील 'स्टेट हाऊस'मध्ये राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी भव्य स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींना औपचारिक 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. हा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी सेशेल्सचे नागरिक आणि सरकारचे आभार मानले. "भारत आणि सेशेल्सने मिळून हिंदी महासागराला 'संधींचा महासागर' बनवण्याच्या दिशेने एकत्र काम केले पाहिजे," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
द्विपक्षीय संबंध आणि सहकार्यावर चर्चा
 
 
सर्वोच्च सन्मान सोहळ्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात उच्चस्तरीय बैठक पार पडली. भारत आणि सेशेल्समधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर आणि दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर यावेळी चर्चा झाली. "भारत आपल्या यशस्वी 'डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर' (DPI) क्षेत्रातील अनुभव सेशेल्ससोबत शेअर करेल, ज्यामुळे तेथील डिजिटल व्यवस्थेला गती मिळेल," असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
 
 
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे भारत आणि सेशेल्समधील राजनैतिक व मैत्रीपूर्ण संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत.