चार महिन्याच्या दहशतीनंतर अखेर लंगडी ‘टी-२७’ जेरबंद!

दोघांचा बळी, दोन जखमी...

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
भंडारा,
tigress finally captured दोघांचा बळी घेत, दोघांना गंभीर जखमी करुन साकोली आणि लाखनी तालुक्यासह नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये गेल्या चार महिन्यांपासून भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या ‘टी-२७’ या लंगड्या वाघिणीला अखेर रविवारी 28 रोजी उमरझरी परिसरातील जंगलातून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आव्हानात्मक मोहिमेचा अखेर यशस्वी शेवट झाला असून परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
 
 
tigress finally captured
 
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया व भंडारा वनविभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) तसेच एफडीसीएमच्या वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या हे धाडसी ऑपरेशन पार पाडले. अनेक वेळा वनविभागाच्या हाती लागूनही चकवा देणाऱ्या या वाघिणीला पकडण्यासाठी शेकडो वनकर्मचारी, तज्ज्ञ आणि अधिकारी दिवस-रात्र प्रयत्नशील होते.
 
 
मार्च महिन्यात या वाघिणीने अवघ्या १९ दिवसांत तीन हल्ले करून परिसरात दहशत निर्माण केली होती. १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील वसंत मेश्राम यांचा मोहफुले वेचताना या वाघिणीच्या हल्ल्यात हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर २७ मार्च रोजी उमरझरी येथील माया सोनवणे यांच्यावर दबा धरून बसलेल्या या वाघिणीने हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या माया सोनवणे यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आमगाव येथील छाया मुंगमोडे या महिला देखील वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या.
दरम्यान, २४ जून रोजी आमगाव येथील हरिश्चंद्र मडावी यांच्यावर पुन्हा हल्ला करून वाघिणीने त्यांचा बळी घेतला.
 
 
या घटनेनंतर नागरिकांचा संताप अनावर झाला होता. शेतकरी, मजूर आणि वनक्षेत्रालगत राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडतानाही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने अनेक ठिकाणी पिंजरे, कॅमेरे, ट्रॅप यंत्रणा आणि विशेष पथके तैनात केली होती. मात्र जखमी अवस्थेतील ही वाघीण अत्यंत सावधपणे हालचाली करत असल्याने ती पकडण्यास विलंब होत होता.
 
 
रविवारी सकाळी उमरझरी परिसरातील उसाच्या शेतात एका शेळीची शिकार केल्यानंतर वाघीण त्या परिसरात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर तातडीने राबविण्यात आलेल्या कारवाईत तिला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले. सध्या तिच्या वैद्यकीय तपासणी व पुढील पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक (ACF) सुहास कांबळे यांनी दिली. गेल्या चार महिन्यांपासून भीतीचे प्रतीक ठरलेली ‘टी-२७’ अखेर जेरबंद झाल्याने साकोली तालुक्यासह संपूर्ण परिसराने सुटकेचा श्वास घेतला आहे.