यंदाच्या आषाढी वारीत 'तुकाराम मुंढे पॅटर्न' दिसणार

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
पंढरपूर
tukaram mundhe संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता आषाढी वारीकडे लागले असून, ७ जुलै रोजी देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी, तर ८ जुलै रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. अवघ्या काही दिवसांत विठ्ठलभक्तीच्या वातावरणाने संपूर्ण राज्य भारावून जाणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. वारकऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने यंदा विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाची महत्त्वाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्यावर सोपवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
 

tukaram mundhe  
यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाकडून धडक कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. पंढरपूर येथे आयोजित बैठकीत त्यांनी वारीदरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी आणि कारवाया करून वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध होईल, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगितले. या मोहिमेच्या अनुषंगाने तुकाराम मुंढे यांच्याशीही आपण संपर्क साधणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदाच्या वारीत एफडीएचा ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच बैठकीत tukaram mundhe  पर्यावरणपूरक वारीचा संकल्पही जाहीर करण्यात आला. त्यानुसार, संपूर्ण पालखी मार्गावरील ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेकडून दहा हजार झाडांची लागवड केली जाणार असून, यंदाची आषाढी वारी ‘हरित वारी’ म्हणून साकारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरकडे येत असल्याने त्यांच्या प्रवासाची सुविधा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून पाच हजार बसांची विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.