मृग कोरडे, आर्द्रानेही दिला दगा

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
- पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा, खरीप हंगाम संकटात

गोंदिया, 
Waiting for Rain ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’ ही बालपणीची कविता आज गोंदिया जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मनातील आर्त हाक बनली आहे. मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर आद्रा नक्षत्रही उजाडत असताना पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याने खरीप हंगाम अभूतपूर्व संकटात सापडला आहे. आभाळात ढगांची गर्दी होत असली तरी पावसाचा एक थेंबही न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
 
 
rain dksl
 
जिल्ह्यात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक असून जून महिना संपत आला तरी अनेक भागांत धानाची रोवणी तर दूरच, नर्सरी टाकण्याचे कामही पूर्ण होऊ शकलेले नाही. पावसाअभावी शेतातील सर्व कामे ठप्प झाली असून शेतकरी चिंतेत आहे. सुरुवातीला धाडस करून पेरणी केलेल्या शेतकर्‍यांचे बियाणे जमिनीतच करपण्याच्या स्थितीत असून दुबार पेरणीचे संकट त्यांच्या डोक्यावर घोंगावत आहे. गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. सिंचनाच्या मर्यादित सुविधा आणि यंदाच्या पावसातील प्रदीर्घ खंडामुळे अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. शिवार ओसाड पडले असताना दरवर्षी ट्रॅक्टरच्या आवाजाने गजबजणारी शेते यंदा शांत आणि निर्मनुष्य दिसत आहेत. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकर्‍यांसमोर बँक कर्जाचे हप्ते, वाढता शेतीखर्च आणि कौटुंबिक जबाबदार्‍यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाच्या विलंबामुळे केवळ शेतीच नव्हे, तर जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामानातील अनिश्चितता आणि संभाव्य ‘अल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत शेतकर्‍यांच्या आशा आता फक्त वेळेवर आणि समाधानकारक पावसावरच टिकून आहेत. हात जोडून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला आता पावसाच्या आगमनाचीच प्रतीक्षा आहे. लवकरच दमदार पाऊस झाला नाही, तर यंदाचा खरीप हंगाम मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.