१४५४ शाळांमध्ये वाजणार पहिली घंटा

प्रवेशोत्सवातून विद्यार्थ्यांचे होणार स्वागत

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वर्धा,
wardha  education जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात मंगळवार ३० जूनपासून होणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ४५४ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मंगळवारी पहिली घंटा वाजणार असून प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे.
 

wardha, education 
दीर्घ उन्हाळी सुटीनंतर पुन्हा एकदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलकलाट होणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळांमध्ये विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सवाची तयारी जिपच्या शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण केले जाणार आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. पालकांनीही मुलांना शाळेत पाठवण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. बाजारात शैक्षणिक साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे. पहिल्या दिवशी शाळांमध्ये वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रम देखील राबवले जाणार आहे.
 
सत्राच्या पहिल्या दिवशी wardha education  विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील सरकारी आणि खाजगी अनुदानित ९५० शाळांमधील पहिली ते आठवीच्या ८८ हजार ५१२ विद्यार्थ्यांना ४ लाख ६३ हजार १३५ पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे. सर्व पुस्तके शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत संबंधित शाळांपर्यंत पोहोचविण्यात आली आहेत. जिल्हा परिषद आणि नगर परिषद अंतर्गत चालवल्या जाणार्‍या शाळांतील ४१ हजार ३४० विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गणवेशासोबत शूज आणि मोजे देखील दिले जाणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी ४७० रुपयांप्रमाणे पहिल्या टप्प्याचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये गणवेशासाठी ३०० रुपये तर शूज आणि मोज्यांसाठी १७० रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या निधीत चांगल्या दर्जाचा गणवेश, शूज आणि मोजे उपलब्ध होतील का, असाही प्रश्न काही पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुकानिहाय शाळांची स्थिती
आष्टी : ९०
कारंजा : १२०
समुद्रपूर : २००
सेलू : १५४
देवळी : १६८
हिंगणघाट : २२०
वर्धा : २९३
आर्वी : २०९