पाणीपट्टीचे ४०.२७ कोटी थकले

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
वर्धा,
water tax pending वर्धा शहराला नगरपालिका तर शेजारील पिपरी (मेघे)सह १३ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. पण, याच गावातील २१ हजार ३२ नागरिकांकडे ४०.२७ कोटींचा पाणीकर थकीत आहे. नागरिकांनी थकीत कर वेळीच अदा केल्यास मजिप्राची आर्थिक स्थिती थोडी का होई ना, पण सुधारणार आहे.
 

water tax pending  
महाकाळी येथील धाम प्रकल्पातून वर्धा शहर व परिसरातील १३ गावांना पाणीपुरवठा केला जातो. याच जलाशयातून सोडण्यात आलेल्या पाण्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन येळाकेळी येथील धाम नदीतून उचल करते. त्यानंतर पाणी मुख्य जलवाहिनीने हनुमान टेकडी भागातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. या ठिकाणी पाण्यावर प्रक्रिया होऊन पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा पिपरी (मेघे), आलोडी, बोरगाव (मेघे), नालवाडी, साटोडा, दत्तपूर, सेलूकाटे, वायगाव (नि.), वरुड, सिंदी (मेघे), चितोडा, म्हसाळा, सावंगी (मेघे) या गावातील नागरिकांना करते. मात्र, याच गावातील २१ हजार ३२ नागरिकांकडे पाणीपट्टी करापोटी ४० कोटी २७ लाख ९७ हजार ७४७ रुपये थकल्याने मजिप्राच्या अडचणीत भर पडली आहे.
पाणीपट्टी कराची मोठी रकम ग्राहकांकडे थकल्याने थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. अल्प मनुष्यबळामुळे ही मोहीम प्रभावीपणे १३ गावांमध्ये राबविण्यासाठी मजिप्राला अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पृष्ठभूमीवर पिपरी (मेघे)सह १३ गावांतील थकबाकीदारांनी स्वत: पुढाकार घेत त्यांच्याकडील थकबाकी अदा करावी, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता दीपक धोटे यांनी केले आहे.