'ईठा’ चित्रपटावर विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा आक्षेप

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
मुंबई
eetha movie अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत झळकणारा आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ईठा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या शीर्षकासह टीझरमधील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवत निर्मात्यांसमोर महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांची ३ जुलैपर्यंत दखल घेतली नाही, तर न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
 

eetha movie, shraddha kapoor 
विठाबाई नारायणगावकर यांचे पुत्र कैलास नारायणगावकर आणि नातू मोहित नारायणगावकर यांनी एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, विठाबाई यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार होत असल्याचा त्यांना आनंद आणि अभिमान आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी किंवा चित्रीकरणादरम्यान कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे विठाबाई यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि वास्तव अधिक प्रभावीपणे चित्रपटात मांडण्याची संधी गमावली गेल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
टीझरमधील काही दृश्यांबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. स्टेजच्या मागे बाळाचा जन्म झाल्याचे दाखवण्यात आले असून, अशा संवेदनशील प्रसंगांचे चित्रण करण्यापूर्वी कुटुंबीयांकडून वस्तुस्थितीची खात्री करून घेणे आवश्यक होते, असे कैलास नारायणगावकर यांनी नमूद केले. विठाबाईंचा संघर्ष मोठ्या पडद्यावर पोहोचत असल्याचा आनंद असला, तरी त्याचे वास्तवाशी सुसंगत आणि जबाबदारीने चित्रण होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
चित्रपटाच्या शीर्षकाबाबतही कुटुंबीयांनी आपली भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागात ‘विठा’चा उच्चार ‘ईठा’ असा केला जात असला, तरी नव्या पिढीला विठाबाईंची खरी ओळख समजण्यासाठी त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चित्रपटाचे नाव बदलून ‘विठा’ करावे किंवा उपशीर्षकात ‘विठाबाई नारायणगावकर’ असे पूर्ण नाव नमूद करावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुटुंबीयांना दाखवण्यात यावा, जेणेकरून त्यामध्ये काही तथ्यात्मक चुका किंवा आक्षेपार्ह बाबी असल्यास त्या वेळेत दुरुस्त करता येतील, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
 
 
मोहित नारायणगावकर यांनी सांगितले की, या सर्व मागण्या ई-मेलद्वारे चित्रपटाच्या निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. तसेच, विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित प्रकाशित झालेल्या एका पुस्तकातील अनेक माहिती ऐकीव स्वरूपाची असल्याचा दावाही त्यांनी केला. त्या पुस्तकाचा आधार घेऊन चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असेल, तर इतिहासाचे चुकीचे चित्रण होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, विठाबाई eetha movie  ज्या तमाशा फडाशी संबंधित होत्या, त्या फडाचे मूळ नाव ‘भाऊ बापू नारायणगावकर’ असे होते. मात्र, चित्रपटात त्याचा अपूर्ण उल्लेख करण्यात आल्याने मूळ इतिहासाला धक्का बसू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.निर्मात्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती देत मोहित नारायणगावकर यांनी २ ते ३ जुलैपर्यंत संपर्क न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “चित्रपट चांगला असेल, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मात्र, विठाबाई नारायणगावकर यांच्या इतिहासाचे चुकीचे किंवा आक्षेपार्ह चित्रण झाल्यास आम्ही शांत बसणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.