जून महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात 91.8 मिमी पाऊस

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर, 
rainfall-in-chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 177.4 मिमी इतके असते. तर यंदाच्या पावसाळ्यात 29 जूनपर्यंत सरासरी 91.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाऊस बल्लारपूर तालुक्यात 236.7 मिमी, तर सर्वात कमी पाऊस ब्रम्हपुरी तालुक्यात 47.7 मिमी इतका पडला आहे. जिल्ह्यात जून महिन्याची सुरुवातीला पावसाने दडी मारली असली, तरी त्यानंतर पावसाच्या सरी बरसल्या.
 
 

rainfall-in-chandrapur 
 
 
 
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा मान्सूनच्या आगमानंतर अपेक्षित पाऊस झाला नव्हता. जून महिन्याच्या अखेरीपर्यंतही पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या. पेरणीसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावा नसल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेकांना शेतीची पूव मर्शागत करूनही पावसाच्या प्रतिक्षेत थांबावे लागत होते. मात्र जून महिन्याचा अखेरीस जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहे. त्यामुळे शेतकरी आता शेती मशागत, बियाण्यांची तयारी आणि पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. विविध गावांमध्ये शेतांमध्ये ट्रॅक्टर, बैलजोडी आणि शेतमजुरांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 
 
चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास अर्ध्या तालुक्यामध्ये धाान हे प्रमुख पीक घेतले जाते. तर राजुरा, वरोडा, भद्रावती, कोरपना, जिवती, बल्लारपूर आणि गोंडपिपरी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व कापूस पिकांची लावगड केली जाते. या भागातही पावसामुळे पेरणीच्या कामाला गती मिळाली आहे. तसेच नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल, चिमूर आणि सावली तालुक्यांमध्ये धान लागवडीला विशेष वेग आला आहे. शेतकर्‍यांनी आता खरीप हंगमासाठी आवश्यक तयारी सुरू केली असून, आगामी काळात पाऊस सातत्याने राहिल्यास शेतकरी हंगाम वेळेत पूर्ण करणार अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
 
सर्वाधिक पाऊस बल्लारपूर तालुक्यात
 
 
यंदाच्या पावसाळ्यात 29 जून सकाळी 10.48 वाजेपर्यंत बल्लारपूर तालुक्यात 236.7 मिमी, चंद्रपूर येथे 139.8 मिमी, गोंडपिपरी 128.9 मिमी, भद्रावती, 119.4, वरोडा 114.9 मिमी, मूल 100.3 मिमी, कोरपना 101.8 मिमी, जिवती 98 मिमी, पोंभुर्णा 84.5 मिमी, राजुरा 80.4 मिमी, चिमूर 73.3, नागभीड 65.9 मिमी, सावली 61.8 मिमी, सिंदेवाही 43.9, तर ब्रम्हपुरी तालुक्यात 47.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.