भंडारा,
ahilyadevi holkar loan waiver scheme शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ पारदर्शक, प्रभावी आणि वेळेत मिळावा यासाठी भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत योजनेची अंमलबजावणी, समन्वय आणि तक्रार निवारणाची जबाबदारी पार पाडण्यात येणार आहे.
समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्हा समन्वयक (व्यापारी बँका) यांचा सदस्य म्हणून समावेश असून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था श्री. शुद्धोधन कांबळे हे समितीचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत.
ही समिती शेतकऱ्यांना योजनेचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी आवश्यक विविध बाबींवर देखरेख ठेवणार आहे. लाभासाठी अपात्र असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेचे संनियंत्रण, आधारशी जोडणी न झालेल्या कर्जखात्यांची माहिती प्रसिद्ध करणे, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करणे तसेच शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणासाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन करून त्यास व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करणे तसेच संपूर्ण योजनेची जिल्हास्तरावर प्रभावी प्रसिद्धी करण्याची जबाबदारीही समितीवर सोपविण्यात आली आहे.शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा, बँका व संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधला जावा आणि अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राखली जावी, या उद्देशाने ही समिती कार्यरत राहणार असून योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत ती कार्यरत राहील.