मुंबई
Akanksha Chamola ‘लॉक अप २’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्याच भागाने प्रेक्षकांना मोठा धक्का दिला आहे. २७ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या शोमध्ये १५ स्पर्धकांपैकी एक म्हणून टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोला सहभागी झाली आहे. मात्र, शोच्या सुरुवातीलाच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित केलेल्या खुलाशामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
शोदरम्यान आकांक्षा चमोला हिने आपण आणि गौरव खन्ना विभक्त होत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. तसेच, गेल्या वर्षभरापासून दोघेही वेगळे राहत असल्याची माहितीही तिने दिली. तिच्या या वक्तव्यामुळे शोचे सूत्रसंचालक फराह खान आणि रितेश देशमुख यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
आकांक्षाच्या या Akanksha Chamola विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, त्यामध्ये राखी सावंतची प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे. शोमधील एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना राखीने हसणाऱ्या इमोजीसह केवळ “खोटारडी” असा एकच शब्द लिहिला. तिच्या या कमेंटवरही नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने, “तुझं बरोबर ओळखलंस,” असे म्हटले, तर दुसऱ्या युझरने हा संपूर्ण प्रकार शोचा टीआरपी वाढवण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट असू शकतो, असे मत व्यक्त केले.शोमध्ये आकांक्षा म्हणाली, “मी आणि गौरव खन्ना घटस्फोट घेत आहोत. आम्ही गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत होतो आणि लोकांना आतापर्यंत याबद्दल माहिती नव्हती.” तिने पुढे स्पष्ट केले की, हा निर्णय दोघांनी परस्परसंमतीने घेतला असून, गेल्या वर्षभरापासून त्यावर चर्चा सुरू होती.विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘बिग बॉस १९’च्या फॅमिली वीकदरम्यान आकांक्षा आणि गौरव एकत्र दिसले होते. त्या वेळी दोघांमध्ये चांगले प्रेमळ संबंध असल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यानंतरही ते सोशल मीडियावर अनेकदा एकत्र झळकले होते. इतकेच नव्हे, तर जानेवारी महिन्यात त्यांनी आकांक्षाचा वाढदिवसही एकत्र साजरा केला होता. त्यामुळे ‘लॉक अप २’मध्ये आकांक्षाने केलेल्या दाव्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.