जय, वीरू आणि बसंती!

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
दिल्ली दिनांक 
रवींद्र दाणी 
America-Israel जय आणि वीरू! ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटातील ही एक जोडी! आंतरराष्ट्रीय राजकारणाही एक जोडी आहे- अमेरिका आणि इस्रायल! ‘शोले’मधील जोडीची मैत्री तर शेवटपर्यंत टिकली. पण, आंतरराष्ट्रीय राजकारणातील जय आणि वीरू आता परस्परांविरुद्ध बोलू लागले आहेत. परस्परांवर तोफा डागू लागले आहेत. दोघांच्या मैत्रीत इराण हा ‘बसंती‘ ठरला आहे. अमेरिकेने या बसंतीसोबत नांदणे इस्रायलला मान्य नाही.
 
 
us israil
 
इस्रायलने लेबनॉनपर पुन्हा हल्ला चढविल्याने स्वित्झर्लंडमध्ये होणारा करार समारोह प्रथम स्थगित करण्यात आला. नंतर इराणने पुन्हा हाेर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. आणि मग बसंती म्हणजे इराणची मनधरणी करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांना स्वित्झर्लंडला जावे लागले. तेथे पुन्हा नवे नाट्य घडले.
 
 
जोडीची कमाल : २८ फेब्रवारी रोजी अमेरिका व इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणच्या विरोधात युद्ध सुरू केले. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा अणि अमेरिकेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून इराणची राजधानी तेहरानच्या एका इमारतीस लक्ष्य करण्यात आले. तेथे इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. त्यांना बैठकीतच ठार करण्यात आले.
जोडी फुटली? : युद्ध संपविण्याच्या मुद्यावर मात्र दोन्ही देशांत वाद सुरू झाला आहे. एकाला खुर्ची टिकविण्यासाठी युद्ध संपवायचे आहे तर दुसऱ्याला खुर्ची टिकविण्यासाठी युद्ध सुरू ठेवायचे आहे. दोन्ही देशांत ऑक्टोबर व नोव्हेंबर हे महिने निवडणुकीचे आहेत.
 
 
निर्णायक नोव्हेंबर : नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत ‘मिड टर्म‘ आहे. अमेरिकन राष्ट्रपतीचा चार वर्षांचा कार्यकाळ दोन वर्ष पूर्ण होत असताना या निवडणुका होत असतात म्हणून त्याला मिड टर्म म्हटले जाते. या नोव्हेंबरात ट्रम्प यांच्या निवडीला दोन वर्ष पूर्ण होतील. आता नोव्हेंबर महिन्यात तेथे तीन कारणांसाठी मतदान होणार आहे. अमेरिकन काँग्रेसच्या सर्व ४३४ जागांसाठी नवे प्रतिनिधी निवडणे, अमेरिकन सिनेटच्या एक तृतीयांश म्हणजे ३३ जागांवर नवे प्रतिनिधी निवडणे आणि ५० पैकी एक तृतीयांश राज्यांचे गव्हर्नर निवडणे. राष्ट्रपती ट्रम्प यांची खुर्ची या निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून आहे. या निवडणुकीत पराभव होणे म्हणजे राष्ट्रपती ट्रम्प यांची अवस्था काळजीवाहू राष्ट्रपती होण्यासारखी आहे. यासाठी त्यांना तेहरानसोबत तह हवा होता.
 
रेटिंग घसरले : अमेरिकेत इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. तसेही अमेरिकन जनमानस युद्धाच्या बाजूने नाही. याचा परिणाम म्हणजे ट्रम्प यांचे रेटिंग घसरू लागले आहे. पण, ते याबाबतच्या सर्वेक्षणांना महत्त्व देत नव्हते. त्यावर त्यांचा विश्वास नव्हता. पण, काही दिवसांपूर्वी न्यू याॅर्कमध्ये झालेल्या एक बास्केेटबॉल सामन्याने त्यांचे डोळे खाडकन उघडले असावे. राष्ट्रपती ट्रम्प आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसह हा सामना पाहण्यासाठी पोहोचले. सामना सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रगीत झाले आणि नंतर ट्रम्प यांचा निषेध सुरू झाला. काही क्षणात सामना सुरू झाला. पण, त्यापूर्वी दिसलेले दृश्य ट्रम्प यांना अस्वस्थ करून गेले आणि त्यांनी इराणसोबत युद्ध संपविण्याचा निर्णय घेतला. २० हजार प्रेक्षक बसलेल्या स्टेडियममध्ये आपला अशा प्रकारे निषेध व्हावा याने ट्रम्प हादरले असावेत. नंतर त्यांना युद्धबंदीची एवढी घाई झाली होती की अधिकृत समारोहापूर्वीच त्यांनी फ्रान्समध्ये त्यावर सही केली.
 
 
आणि इस्रायल : दुसरीकडे इस्रायलला युद्ध चालू राहावे असे वाटते. कारण ऑक्टोबर महिन्यात तेथे निवडणुका आहेत. युद्धबंदी म्हणजे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या पक्षाचा हमखास पराभव. यातून आता दोन्ही देशांच्या मैत्रीत तणाव आला आहे. अमेरिका-इराण युद्धबंदीने इस्रायलला हैराण केले आहे. अमेरिकेच्या मागील काही राष्ट्रपतींमध्ये ट्रम्प हेच इस्रायलचे कट्टर समर्थक मानले जात होते. आपल्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी इस्रायलने ताब्यात घेतलेल्या गोलन पहाडींना इस्रायलचा भाग म्हणून मान्यता दिली. इस्रायल अनेक बाबतीत अमेरिकेवर अवलंबून आहे. अमेरिकेने इस्रायलच्या डोक्यावरील आपला हात काढून घेतला तर त्याची अवस्था बिकट होईल यात शंका नाही.
 
 
वाढती हेरगिरी : इस्रायल म्हणजे हेरगिरीच्या क्षेत्रातील दादा. इस्रायलच्या मोसादने मोठमोठ्या कामगिरी पार पाडल्या आहेत. या इस्रायलने आता अमेरिकेन नेत्यांची-अधिकाऱ्यांची हेरगिरी सुरू केली. राष्ट्रपती ट्रम्प यांनी ज्या अधिकाऱ्यांवर इराणसोबत चर्चा करण्याचे काम सोपविले होते, त्यांची हेरगिरी इस्रायलने सुरू केली. ही हेरगिरी एवढी वाढली की सीआयएला ही बाब राष्ट्रपती ट्रम्प यांच्या लक्षात आणून द्यावी लागली. इस्रायल अधूनमधून अमेरिकेचीही हेरगिरी करीत होताच. पण आता या हेरगिरीचा स्तर गंभीर झाल्याचे सीआयएने ट्रम्प यांना सांगितले असे अमेरिकन माध्यमांनी नमूद केले. यानंतर ट्रम्प यांचा पारा भडकला. त्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानास दूरध्वनी करून अक्षरश: शिवीगाळ केल्याचे वृत्त अमेरिकन वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे.
 
 
मी असेपर्यंत... : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू राष्ट्रपती ट्रम्प यांचे ऐकण्याची शक्यता कमी आहे. कारण प्रश्न त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा आहे. ‘२८ फेब्रुवारीला हल्ला करून आम्ही इराणला अण्वस्त्र तयार करण्यापासून रोखले आहे. आणि जोपर्यंत मी पंतप्रधान आहे, मी इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही’ अशी भूमिका नेतान्याहू यांनी घेतली आहे. इस्रायलमधील निवडणुका तर अमेरिकेतील निवडणुकीपेक्षा एक महिना अगोदर होत आहेत आणि त्या नेतान्याहू यांचे राजकीय भवितव्य ठरविणार आहेत.
 
 
अन्यथा कारागृहात : पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. एकदा का नेतान्याहू निवडणूक हरले तर त्यांना सरळ कारागृहात जावे लागेल हे ठरलेले आहे. नेतान्याहू यांना कारागृहात जाण्यापासून मी वाचविले हे ट्रम्प यांचे विधान अगदी बरोबर आहे. अमेरिकेच्या सहकार्याशिवाय इस्रायल काहीच करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. तेथे संमिश्र सरकार आहे. कोणत्याही पक्षाजवळ बहुमत नाही. नेतान्याहू यांनी मागील जवळपास तीन वर्षे आपले सरकार युद्धाच्या बळावर टिकवून ठेवले आहे. आता अमेरिकेच्या दबावाखाली युद्ध संपविणे म्हणजे आत्मघात याची कल्पना नेतान्याहू यांना आली असल्याने त्यांनी अमेरिकेच्या विरोधात जणू बंड पुकारले आहे.
 
 
हमास आणि हिजबुल्लाह : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या करारास सुरुंग लावण्याचे प्रयत्न इस्रायलने चालविले आहेत. हमास आणि हिजबुल्लाह या दोन दहशतवादी संघटनांशी इस्रायलचे हाडवैर. हमासचे कार्यक्षेत्र गाझा पट्टी हे होते तर हिजबुल्लाह लेबनॉनमध्ये बसून आपल्या कारवाया करीत असते. या दोन्ही संघटनांना इराणचा पाठिंबा. त्यामुळे हिजबुल्लाहला टाळून इराण कोणताही निर्णय करू शकत नाही. याची कल्पना असल्याने इस्रायलने थेट इराणवर हल्ले करण्याऐवजी लेबनॉनवर हल्ले सुरू केले. तो ते थांबविण्यास तयार नाही आणि हे हल्ले थांबल्याशिवाय इराण युद्धबंदी स्वीकारण्यास तयार नाही.
 
 
जगाची मानगूट! : इराणसाठी या युद्धाची सर्वांत मोठी ‘उपलब्धी’ म्हणजे जगाची मानगूट कशी पकडायची हे त्याला समजले आहे. हाेर्मुझची सामुद्रधुनी बंद केली की आखाती देश, अमेरिका सारेच वठणीवर येतात हे त्याला उमगले आहे. साऱ्या जगाची अर्थव्यवस्था आपण संकटात आणू शकतो हे इराणने अचूक ओळखले आहे. आणि तो तेच करीत आहे.