चिमुरड्यांच्या किलबिलाटाने शाळांचे अंगण बहरणार...

826 शाळांमध्ये आज वाजणार घंटा!

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
भंडारा
schools दीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील सर्व शाळांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होत आहेत. भंडारा जिल्ह्यातही 826 शाळांची दारे उघडतील. ‘शाळा सुरू होणार’ या कल्पनेनेच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पहिल्याच दिवशी नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
 

bhandara, schools education, 
उद्यापासून सुरू होणाऱ्या शाळांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व तयारी केली आहे. प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनात जवळपास 354 शाळांमध्ये पहिल्या दिवशी 6 लोकप्रतिनिधी, 25 वरिष्ठ अधिकारी, 154 लोकप्रतिनिधी आणि 169 इतर अधिकारी भेटी देणार असल्याचे समजते. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, पाठ्यपुस्तके त्यांच्या हाती पडावी या दृष्टीने शिक्षण विभागाने पूर्णपणे तयारी केली असल्याचे प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी निर्मला माने यांनी सांगितले.
दुसरीकडे शाळा स्तरावर, प्रवेशोत्सवाची शाळांकडून वेगवेगळ्या पद्धतीने तयारी केली जात आहे.पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या चिमुरड्यांचे स्वागत शिक्षकांकडून गुलाबपुष्प आणि गोड खाऊ देऊन केले जाणार आहे. प्रवेशद्वार आणि वर्ग खोल्या आकर्षक रांगोळ्या, फुगे आणि तोरणांनी सजवण्यात येणार असल्याचे समजते. कुठे विद्यार्थ्यांची दिंडी, ढोल ताशाचे वादन अशा अनेक गोष्टींची नियोजन करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान सुरू होणाऱ्या शाळांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून बाजारपेठेत कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. नवीन दप्तर, वॉटर बॉटल, रंगीबेरंगी कंपास पेटी, गणवेश आणि वह्या-पुस्तके खरेदी करण्यासाठी पालकांची दुकानांवर एकच गर्दी उडाली होती. आपल्या आवडीचे दप्तर निवडताना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
पहिलीत प्रवेश घेणाऱ्या लहान मुलांच्या पालकांमध्ये अधिक उत्सुकता दिसून येत आहे. आपल्या पाल्याचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा, यासाठी पालकांनी विशेष तयारी केली आहे. शाळा व्यवस्थापनानेही लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी शिक्षकांना सूचना दिल्या आहेत. एकंदरीत, सुट्ट्यांची धम्माल संपवून आता मुले पुन्हा एकदा अभ्यासाच्या आणि मैत्रीच्या दुनियेत रमण्यासाठी सज्ज झाली आहेत.