पुणे,
Bhimrao Kamble sentenced to death पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सोमवारी (ता. २९) हा ऐतिहासिक निकाल दिला. या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवण्यात आल्याची घोषणा मागील सुनावणीतच करण्यात आली होती.या खटल्यात सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध अत्यंत कठोर भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचा आधार देत फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीने केलेली क्रूरता, पीडितेचे वय, आणि समाजावर झालेला परिणाम लक्षात घेऊन हे प्रकरण “रेअर ऑफ द रेअर” श्रेणीत मोडते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने निकाल वाचनात नमूद केले की, पीडित मुलगी अत्यंत असहाय्य अवस्थेत होती आणि आरोपीने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब हे सर्व आरोपीविरुद्ध ठोस असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आरोपीचा पूर्व इतिहासही गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.या प्रकरणाचा तप अत्यंत वेगाने पूर्ण करण्यातला होता. अवघ्या १६ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि सुमारे ५५ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. या जलद सुनावणीमुळे हा खटला राज्यातील अत्यंत वेगाने निकाली लागलेल्या प्रकरणांपैकी एक मानला जात आहे. न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, आरोपीने केलेले कृत्य अत्यंत अमानवी, क्रूर आणि समाजमनाला हादरवणारे आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्याला मृत्युदंडाची शिक्षा योग्य ठरते. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. न्यायालयाच्या या निकालानंतर पीडित कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.