सडक अर्जुनी ,
car-plunges-off-bridge : कोहमारा-नवेगावबांध मार्गावरील चुलबंद नदीवरील पुलाचे कठडे तोडून आर्टिका कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाल्याची घटना रविवारी 28 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, यंदा पावसाने विलंब केल्याने नदी कोरडी असल्यामुळे कार नदीतील रेतीवर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जिवीतहाणी झाली नाही. सर्व जखमींवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करून रात्रीच त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.

तिरोडा तालुक्यातील डाकराम सुकळी येथील सुनील नामदेव मेश्राम, संदीप भाऊराव कुर्वे, रूपाली सतीश राणे, प्रतिमा प्रल्हाद शेंडे, कल्पना निलेश उके, पूर्वी सतीश राणे, यश निलेश उके, विवेक कैलास शेंडे व चालक सुनील पाठक सर्वजण रविवारी आर्टिका कार क्रमांक एमएच 14 एफजी 2068 नवेगावबांध वरून कोहमराच्या दिशेने येत असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन चुलबंद नदीवरील पुलाचे कठडे (रेलिंग) तोडून नदीत कोसळले. यावेळी वाहनाचे चारही चाके वर आणि टप खाली अशा परिस्थितीत पडल्याने कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे, दरवर्षी या कालावधीत नदी दुथडी भरून वाहते, मात्र, यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने नदी कोरडीठाक असून सर्वत्र वाळू आहे. त्यामुळे मोठा अपघात टळला असल्याचे परिसरात बोलले जात आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गुणवंत कठाणे करीत आहे.