बुलढाणा,
charan-seva-initiative-in-buldhana : आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचे शनिवारी अनेक वारकर्यांसह बुलढाणा शहरात आगमन झाले. पालखीच्या स्वागतासह यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ’चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई यांच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून राज्यभर राबविण्यात येणारा हा उपक्रम यंदा प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला.
आ. संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने व हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपक्रमांतर्गत वसंतप्रभा भौतिक उपचार महाविद्यालय, बुलढाणा तसेच राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय, बुलढाणा येथील विद्यार्थ्यांनी पालखीसोबत आलेल्या वारकर्यांना वेदना कमी करण्यासाठी तेल अभ्यंग व भौतिक उपचार (फिजिओथेरपी) करून उपशम चिकित्सा प्रदान केली. दिवसभर अनेक वारकर्यांनी या सेवांचा लाभ घेतला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबईचे कक्षप्रमुख रामेश्वरजी नाईक यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. यासाठी बुलढाणा जिल्हा कक्षातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज राठोड, महसूल सहाय्यक सीमा अहीर तसेच कक्ष समन्वयक गजानन चाटे यांनी नियोजन व अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना तात्काळ वेदनाशामक उपचार उपलब्ध करून देणारा हा उपक्रम वारकर्यांसाठी दिलासादायक ठरला. बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या चरणसेवा उपक्रमाचे वारकरी व नागरिकांनी स्वागत केले.