दहशतवाद पेराल तर फळंही भोगावी लागतील!

काँग्रेसचा पाकिस्तानला इशारा

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Congress warns Pakistan पाकिस्तानातील कराची येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनी थेट भारताला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला की, या हल्ल्यामागे भारताचा हात असून भारताशी संबंधित जमात-उल-अहरार या संघटनेने ही कारवाई घडवून आणली. पाकिस्तानच्या या आरोपांनंतर भारतातील राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या असून काँग्रेसने पाकिस्तानवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
 
 
zwq5
 
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी २१ ऑक्टोबर २०११ रोजी पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्रीहिना रब्बानी खार यांना दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली. हिलरी क्लिंटन यांनी त्यावेळी म्हटले होते की, तुम्ही तुमच्या अंगणात साप पाळून ते फक्त शेजाऱ्यांनाच चावतील अशी अपेक्षा करू शकत नाही. एक दिवस ते साप स्वतःलाच चावतात. मनीष तिवारी यांनी पाकिस्तानला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत स्पष्ट केले की, दहशतवादाला आश्रय देणे आणि त्याचा वापर परराष्ट्र धोरणासाठी करणे हीच पाकिस्तानची मोठी समस्या आहे. त्यांनी “डीप स्टेट”वर निशाणा साधत, पाकिस्तानने जगभर दहशतवाद पसरवण्याची भूमिका थांबवावी असे म्हटले.
 
 
दरम्यान, पाकिस्तानच्या डीजी आयएसपीआरने कराची हल्ल्याबाबतपोस्ट करत माहिती दिली की, २७ जून २०२६ रोजी कराचीतील पाकिस्तान रेंजर्स (सिंध) कॅम्पवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या स्फोटानंतर हल्लेखोरांनी सुरक्षा कवच भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या चकमकीत तीन दहशतवादी ठार करण्यात आले, तर एका जखमी अफगाण नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तान लष्कराने सांगितले की, हल्ल्यादरम्यान कर्तव्य बजावत असताना तीन जवान शहीद झाले, तर चार जवान जखमी झाले.
पाकिस्तानने या घटनेनंतर भारतावर गंभीर आरोप करत, भारताच्या पाठिंब्याने चालणाऱ्या संघटनांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी ‘अझम-ए-इस्तेहकाम’ अंतर्गत दहशतवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हल्ल्यानंतर जनरल आसिम मुनीर यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, या हल्ल्यामागील सूत्रधारांविरुद्ध कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही पाकिस्तानकडून देण्यात आला आहे.