वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍याचा मृत्यू

*ताडोबा बफर क्षेत्रालगतच्या चोरगाव शेतशिवारातील घटना

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर,
farmer-dies-in-tiger-attack : सासर्‍याची शेती राखायला गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवारी दूपारी 1 वाजताच्या सुमारास ताडोबा बफर जंगलाच्या सिमेलगत असलेल्या चोरगाव येथील शेतशिवारात घडली. संजय माधव सिडाम (31, रा. केळझर, ता. राजुरा) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
 
 
 
die
 
 
 
राजुरा तालुक्यातील केळझर येथील संजय सिडाम हे चोरगाव येथे राहणार्‍या आपल्या सासर्‍यांची शेती पाहण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आले होते. हे शेत ताडोबा बफर जंगलाच्या अगदी सीमेला लागून आहे. गेल्या चार दिवसांपूर्वीच संजय यांनी अत्यंत आशेने आणि कष्टाने शेतात कपाशीची लागवड केली होती. वन्यप्राण्यांनी पिकांचे नुकसान करू नये म्हणून त्यांनी शेताभोवती सौरऊर्जेवर चालणारे बॅटरीचे कुंपण (वायर) लावण्याचे काम हाती घेतले होते. नेहमीप्रमाणे संजय कुंपणासाठी शेताच्या बाजूच्या झाडांच्या फांद्या तोडत असताना वाघाने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला चढवला. यात संजय यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी घेतली आहे.