वैभवला थांबवू नका! गावस्करांचा निवडकर्त्यांना थेट सवाल

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Gavaskar's question to the selectors आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागल्यानंतर संघ निवडीवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संधी न दिल्याने अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली असून, आता महान फलंदाज Sunil Gavaskar यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. गावस्कर यांनी सांगितले की, वैभव सूर्यवंशी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळायला हवी होती. त्यांच्या मते, इंग्लंडविरुद्ध १ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्याच टी-२० सामन्यात वैभवला संघात स्थान देणे आवश्यक आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आयर्लंड मालिकेत नव्या खेळाडूंना संधी मिळाली, ज्यामध्ये प्रिन्स यादवने प्रभावी गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या. मात्र वैभवसारख्या प्रतिभावान खेळाडूला संधी न देणे हा चुकीचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
Gavaskar
 
गावस्कर यांच्या मते, एका सामन्यात अभिषेक शर्मा किंवा दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला विश्रांती देऊन वैभवला खेळवता आले असते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वैभव मैदानात उतरला असता तर तो कमी धावांवर बादही झाला असता, पण युवा खेळाडूंना संधी देण्याचा हेतू असेल तर त्याला दोन्ही सामन्यांत खेळवणे योग्य ठरले असते.इंग्लंडविरुद्धच्या मालिकेबाबत बोलताना गावस्कर म्हणाले की, फॉर्ममध्ये नसलेल्या फलंदाजांना बाहेर ठेवून वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर संधी द्यावी. त्याच्या उपस्थितीमुळे इंग्लंडच्या संघावर सुरुवातीपासून दबाव निर्माण होऊ शकतो.
 
मात्र, त्यांनी सलामीवीरांचे समर्थनही केले. गेल्या दीड वर्षातील सातत्यपूर्ण कामगिरी पाहता केवळ दोन खराब सामन्यांनंतर सलामीवीरांना बाहेर करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, मधल्या फळीतील एखाद्या फलंदाजाला वगळून वैभवला स्थान दिल्यास संघाला नवा आक्रमक पर्याय मिळू शकतो. गावस्कर यांचा विश्वास आहे की, आयर्लंड मालिकेनंतर इंग्लंडचा संघ अतिआत्मविश्वासात असू शकतो आणि अशा वेळी वैभवसारखा युवा फलंदाज भारतासाठी मोठा गेमचेंजर ठरू शकतो.