युरोपातील 'सायलेंक किलर' अन् १३०० मृत्यू

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
बर्लिन,
Heat: A Silent Killer in Europe युरोप सध्या भीषण उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडला असून, या नैसर्गिक संकटाला तज्ज्ञांनी 'सायलेंक किलर' असे संबोधले आहे. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १,००० हून अधिक अतिरिक्त मृत्यूंची पुष्टी झाली असून, एकूण मृतांचा आकडा १,३०० च्या वर गेला आहे. ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत सांगितले आहे की युरोप हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने तापणारा खंड आहे आणि तो जगाच्या इतर भागांच्या तुलनेत दुप्पट वेगाने गरम होत आहे. सध्या सुमारे १५ कोटी लोक तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत.
 
 
 
Heat: A Silent Killer in Europe
 
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की २१ जूनपासून युरोपमध्ये झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे १,३०० हून अधिक अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. शाळा बंद करणे, वीजपुरवठ्यावर परिणाम आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होणे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, पोलंड आणि झेक प्रजासत्ताक यांसारख्या देशांमध्ये विक्रमी तापमान नोंदवले गेले आहे. जर्मनीमध्ये रेल्वे आणि ट्राम सेवा कमी करण्यात आल्या आहेत.
 
या उष्णतेचा परिणाम केवळ लोकांवरच नव्हे तर पायाभूत सुविधांवरही झाला आहे. हंगेरीमधील पाक्स अणुऊर्जा प्रकल्पाने नदीच्या गरम पाण्यामुळे वीज उत्पादन कमी करावे लागले आहे. तर पो नदीतील इटली) येथील पाणीपातळी इतकी घटली आहे की समुद्राचे पाणी १८ किलोमीटर आत शिरले असून शेतीला धोका निर्माण झाला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्यास हृदय, फुफ्फुसे आणि मेंदूवर गंभीर परिणाम होतात. वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक धोका आहे. हवामान बदलामुळे ही उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. वाढते तापमान, कमी होत चाललेली थंडावा क्षमता आणि रात्रीही न उतरणारी उष्णता यामुळे युरोपमध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.