ढाका,
india-Bangladesh relations बांग्लादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ढाकामध्ये भारताविरोधी भूमिका अधिक आक्रमक होताना दिसत असून, विरोधी नॅशनल सिटिझन पार्टीचे खासदार नाहिद इस्लाम यांनी भारताने बांग्लादेशची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मते, गेल्या १६ वर्षांमध्ये शेख हसीना यांच्या सरकारला भारताने दिलेल्या पाठिंब्यामुळे बांग्लादेशच्या राजकारणावर गंभीर परिणाम झाले. रविवारी, २८ जून रोजी बांग्लादेशच्या संसदेत २०२६-२७ च्या प्रस्तावित राष्ट्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान नाहिद इस्लाम यांनी भारतावर थेट टीका केली. त्यांनी म्हटले की, बांग्लादेशातील भारताचे नवे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी ढाकामध्ये येऊन मैत्री आणि सहकार्याबाबत बोलण्याऐवजी भारताच्या भूमिकेबद्दल माफी मागायला हवी होती.

इस्लाम यांनी आरोप केला की, भारताने अवामी लीग सरकारला गेली १६ वर्षे थेट पाठिंबा दिला. त्यामुळे बांग्लादेशातील लोकशाही आणि राजकीय संतुलनावर परिणाम झाला. संसदेत बोलताना त्यांनी म्हटले की, गोड शब्द आणि मैत्रीपूर्ण संदेशांपेक्षा भारताने आदर आणि समानतेच्या आधारावर नव्या संबंधांची स्पष्ट भूमिका मांडायला हवी.याशिवाय, शरीफ उस्मान हादी हत्या प्रकरणातील आरोपींना आश्रय दिल्याचा आरोपही त्यांनी भारतावर केला. नाहिद इस्लाम यांनी म्हटले की, बांग्लादेशसोबत संबंध सुधारायचे असतील तर भारताने आधी आपल्या भूतकाळातील भूमिकेवर आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
सीमावादावरूनही त्यांनी भारतावर निशाणा साधला. नाहिद इस्लाम यांच्या म्हणण्यानुसार, भारत काही लोकांना ‘बेकायदेशीर बांगलादेशी’ ठरवून जबरदस्तीने बांग्लादेशात पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी असा दावाही केला की, तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर सीमेवर १० बांग्लादेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नाहिद इस्लाम यांनी ‘बांग्लादेश फर्स्ट’ धोरणाचा उल्लेख करत सरकारने केवळ घोषणांमध्ये नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतही हे धोरण दाखवावे, असे सांगितले. परराष्ट्र धोरण मजबूत ठेवणे आणि शेजारी देशांसोबत सन्मानपूर्वक संबंध निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बांग्लादेशच्या संसदेत झालेल्या या वक्तव्यामुळे भारत-बांग्लादेश संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.