शूटआऊटमध्ये इंग्लंडला नमवत भारताचा शानदार विजय

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Indian hockey team भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच प्रो लीग २०२५-२६ मोहिमेचा शानदार शेवट करत यजमान England वर थरारक विजय नोंदवला. लंडन येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने शूटआऊटमध्ये इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि सामना ०-० असा बरोबरीत राहिला. मात्र, शूटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंनी शांतता आणि अचूकता दाखवत विजय आपल्या नावावर केला. ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटर येथे झालेल्या या सामन्यात अभिषेक, शिलानंद लाक्रा आणि हार्दिक सिंग यांनी शूटआऊटमध्ये भारतासाठी गोल नोंदवले. संपूर्ण सामन्यात भारतीय बचावफळीने अत्यंत शिस्तबद्ध खेळ करत इंग्लंडच्या आक्रमणांना यशस्वीपणे रोखले.
 
 
 
hok
सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडने आक्रमक खेळ केला. पहिल्याच काही मिनिटांत त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र भारतीय गोलरक्षक मोहित शशिकुमार याने अप्रतिम बचाव करत संघाला सुरुवातीच्या दबावातून बाहेर काढले. त्यानंतर इंग्लंडचा खेळाडू सॅम वॉर्ड याचा धोकादायक प्रयत्नही त्याने हाणून पाडला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला अभिषेकच्या माध्यमातून गोल करण्याची संधी मिळाली होती, पण ती साधता आली नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्येही इंग्लंडने दबाव कायम ठेवला. निकोलस बंडुरकने गोलच्या जवळ पोहोचला होता, तर भारताच्या जरमनप्रीत सिंगनेही प्रतिस्पर्धी गोलरक्षकाची परीक्षा घेतली.
 
 
 
 
मध्यंतरानंतर भारतीय संघ अधिक आक्रमक झाला. हार्दिक सिंगच्या शानदार प्रतिहल्ल्यानंतर ३७व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण अमनदीप लाक्राला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस सामन्यातील महत्त्वाचा क्षण आला. हेन्री क्रॉफ्ट याच्यावर फाऊल केल्याचा आरोप झाल्यानंतर भारताविरुद्ध पेनल्टी स्ट्रोक देण्यात आला. मात्र भारताने तात्काळ रेफरल घेतले. व्हिडिओ रिप्लेमध्ये टॅकल पूर्णपणे वैध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंचांनी निर्णय बदलला.अंतिम क्वार्टरमध्ये इंग्लंडने जोरदार आक्रमण कायम ठेवले. सामना संपायला अवघे दोन सेकंद शिल्लक असताना इंग्लंडला आणखी एक पेनल्टी कॉर्नर देण्यात आला. मात्र भारताने पुन्हा रेफरल घेत यशस्वीरित्या निर्णय बदलवला. निर्धारित वेळेत स्कोअर ०-० राहिल्यानंतर सामना शूटआऊटकडे गेला. तिथे भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ३-२ असा विजय मिळवला आणि एफआयएच प्रो लीग २०२५-२६ मोहीम विजयी नोंदीने संपवली.