मुंबई
mamaachya goavyala jauya मराठी सिनेसृष्टीत सध्या एका नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून, मैत्रीची हटके क्रेझ मांडणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला.
बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, अलविरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘बालगंधर्व रंगमंदिर’च्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या टीझरचे भव्य अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सिनेरसिकांना चित्रपटातील कलाकारांना थेट भेटण्याची मिळालेली संधी होती.
या प्रसंगी दिग्दर्शक विजू माने यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण आणि प्रवीण तरडे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. या सर्व कलाकारांसोबत रंगलेल्या संवादातून चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली. उपस्थित प्रेक्षकांनी टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट म्हणजे पूर्ण मनोरंजनाचा धमाका ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.टीझरची सुरुवातच गोव्याच्या नॉस्टॅलजिक आणि मजेशीर वातावरणाने होते. कथेत ‘स्ट्रगलर साला’ म्हणून ओळखले जाणारे तीन जिगरी मित्र कुशा, बाबा आणि संत्या तसेच त्यांच्या गटात नव्याने सामील झालेला मामा यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर या चार लोकप्रिय कलाकारांची एकत्रित उपस्थिती पडद्यावर धमाल उडवणार असल्याचे या टीझरमधून स्पष्ट होते. मैत्री, गोव्याची ट्रिप, अनपेक्षित घडामोडी आणि त्याला साथ देणारे दमदार पार्श्वसंगीत यामुळे टीझर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.
दिग्दर्शक विजू माने यांनी mamaachya goavyala jauya या प्रसंगी भावना व्यक्त करताना सांगितले की, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत टीझर लाँच करण्याचा अनुभव अत्यंत खास होता. त्यांच्या मते, हा चित्रपट प्रत्येक मित्रांच्या ग्रुपची गोष्ट सांगतो आणि टीझर हा त्या प्रवासाची एक झलक आहे. मोठ्या पडद्यावर ही गँग एकत्र पाहताना प्रेक्षकांना हास्याचा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फ्रेंडशिप डेच्या वीकेंडला मित्रांसोबत थिएटरमध्ये पाहण्यासाठी हा उत्तम चित्रपट असल्याचेही त्यांनी नमूद केले.‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती स्वतः विजू माने यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांनी सांभाळली आहे. हा मैत्रीचा धमाल अनुभव ३१ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.