मानोरा,
manora crop insurance २०२५ च्या खरीप हंगामातील पीकविम्याच्या रकमेबाबत जिल्ह्यासह मानोरा तालुयातील शेतकरी अजूनही प्रतीक्षेत असून, शासन व विमा कंपन्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मागील वर्षी सोयाबीन काढणीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील संपूर्ण पीक सडून गेले. मात्र, आजतागायत एक रुपयाचाही विमा मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा एकही दाणा घरात आला नाही. अशा गंभीर परिस्थितीतही शासनाने सर्व ‘ट्रिगर’ बंद केल्याने विमा मिळण्यात अडथळे निर्माण झाले. विशेष म्हणजे, पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी संबंधित शेतकर्यांचे नुकसान ‘शून्य’ दाखविल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षात १०० टक्के नुकसान झाले असताना कागदोपत्री सर्व ठीक असल्याचे दाखवले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतातच पीक सडून गेले, तरीही विमा नाकारला जात असल्याने तालुयातील शेतकर्यांच्या पीक विम्याबाबत शासनाला जाग कधी येणार? असा संतप्त सवाल शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आसोला खुर्द परिसरातील शेतकर्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, एक महिन्याच्या आत पीकविम्याची रक्कम मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. शासन व पीकविमा कंपनीने तत्काळ दखल घेऊन शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
मागील वर्षी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी व सततच्या संततधार पावसामुळे उडीद, मुंग,सोयाबीन, आदी पिके नष्ट झाली. मात्र विमा कंपनीने नुकसान शुन्य दाखविले. हा सरळसरळ शेतकर्यावर अन्याय आहे. सरसकट शेतकर्यांना कर्जमुक्तीसह पिक विमाचा लाभ द्यावा, अन्यथा आम्ही शेतकरी आंदोलन करणार !
देवनाथ भोयर पाटील, शेतकरी साखरडोह