व्हिक्टोरिया
Modi's masterstroke in Seychelles पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सच्या ५० व्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत भारत-सेशेल्स संबंधांना नवे बळ दिले आहे. विशेष म्हणजे, अशा स्वरूपाच्या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. त्यांच्या या दौऱ्यामुळे हिंद महासागर क्षेत्रातील सामरिक समीकरणांकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले गेले आहे. सेशेल्स आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात भारतीय सशस्त्र दलानेही दमदार उपस्थिती दर्शवली. संचलनात आसाम रायफल्स, भारतीय नौदल आणि नौदलाच्या मार्चिंगबँडने सहभाग घेतला. तसेच भारतीय नौदलाची तारकश आणि इक्षक ही जहाजे व्हिक्टोरिया बंदरात दाखल झाली.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी सेशेल्सला सागरी निगराणी, किनारी सुरक्षा आणि जलमापन क्षेत्रात भारताकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मोदी म्हणाले की, भारत आणि सेशेल्सची सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्था परस्परांशी घट्ट जोडलेली आहे आणि भविष्यात हे सहकार्य अधिक मजबूत केले जाईल. दरम्यान, भारताच्या वाढत्या प्रभावामुळे चीनही सक्रिय झाल्याचे दिसून आले. भारतासोबतच चीननेही या कार्यक्रमासाठी आपल्या युद्धनौका सेशेल्सकडे पाठवल्या. त्यामुळे हिंद महासागरातील भू-राजकीय स्पर्धा आणखी तीव्र झाल्याचे चित्र समोर आले आहे.
सेशेल्सचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ११५ बेटांचा हा छोटा देश हिंद महासागरातील महत्त्वाच्या सागरी मार्गांवर स्थित आहे. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सागरी व्यापारासाठी सेशेल्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांत चीनने ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ धोरणांतर्गतश्रीलंका, मालदीव आणि पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये बंदरे आणि सामरिक सुविधा उभारून हिंद महासागरात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत सेशेल्स भारतासाठी आणखी महत्त्वाचे ठरत आहे. भारत आणि सेशेल्स यांच्यात असम्प्शन बेटाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारांतर्गत भारत त्या बेटावर पायाभूत सुविधा, हवाई पट्टी आणि सागरी सुविधा उभारत आहे. याशिवाय भारताने किनारी निगराणी रडार प्रणाली (CSRS) देखील उभारली आहे. या प्रणालीमुळे भारतीय नौदलाला संपूर्ण परिसरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होत आहे. मोदींच्या या दौऱ्यामुळे भारताने हिंद महासागरातील आपली रणनीतिक उपस्थिती अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले असून, चीनसाठी हा एक मोठा संदेश मानला जात आहे.