लालफीतशाहीत अडकला ‘पर्यटन विकास’!

- मुरदोलीतील एमटीडीसीच्या रिसॉर्ट बांधकामासाठी जागाच मिळेना

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
प्रमोदकुमार नागनाथे,
गोंदिया, 
murdoli-mtdc-resort : एकीकडे महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, म्हणून पर्यटन विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना दुसरीकडे काही अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित धोरण व संथगती कारभाराने पर्यटन विकास ठप्प होत आहे. याची प्रचिती गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील रिसॉर्ट निर्मितीच्या अडकलेल्या कामावरून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)कडून येथील रिसॉर्ट निर्मीतीसाठी निधी मंजुर असताना बांधकामासाठी अद्यापही जागाच उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या लालफितशाहीत येथील पर्यटन विकास अडकल्याचे दिसून येत आहे.
 
 

gond 
 
 
 
गोंदिया जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, कचारगड, प्रतापगड, हाजराफॉल, सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान, इटियाडोह, नागराचे प्राचीन शिव मंदिर आदी प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, या पर्यटकांना पर्यटनस्थळी राहण्यासाठी सोयीसुविधा नसल्यामुळे त्यांना शंभर ते दिडशे किमीचा प्रवास करून गोंदिया येथील खासगी हॉटेलांचा आसरा घ्यावा लागतो. याच बाबीकडे लक्ष देत तत्कालिन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पाठपुराव्याने एमटीडीसीतर्फे नवेगाव-नागझिरा बफर क्षेत्रातील मुरदोली गावाजवळ रिसॉर्ट निर्मीतीसाठी शासनस्तरावर मान्यता देत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, जंगल शिवाराला लागूनच जिल्हा परिषदेच्या अख्त्यारितील तलावला लागूनच रिसॉर्ट उभारण्याचे ठरले. त्यासाठी सर्व सोपस्कारही पार पडले. मात्र, जिल्हा परिषदेची लालफितशाही आड आली. परिणामी सात वर्षाचा दिर्घ लोटूनही रिसॉर्टची निर्मीती होऊ शकली नाही.
 
 
पर्यटकांना होईल सोयीचे...
 
 
मुरदोलीपासूनन हाकेच्या अंतरावर नागझिरा व्याघ्र प्रकल्प, चुलबंद जलाशय, तर काही अंतरावर शशीकरण, सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान आदी पर्यटनस्थळ आहेत. त्यामुळे या रिसॉर्टची उभारणी झाल्यास पर्यटकांना येथे मुक्काम करून या ठिकाणांना भेट देणे सोयीचे होईल.
 
 
पाठपुरावा सुरू आहे...
 
 
रिसॉर्ट निर्मीतीकरीता मुरदोली येथील जिल्हा परिषदेच्या तलाव परिसराजवळील जागा ठरवण्यात आली. यासाठी प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र, जिल्हा परिषदेकडून सदर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. दरम्यान, आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच रिसॉर्टचे बांधकाम केले जाईल.
- राजकुमार बडोले, आमदार तथा माजी मंत्री