महागाईच्या सावटाखाली शैक्षणिक वर्षाची सुरुवात

- शैक्षणिक साहित्याच्या किमतीत लक्षणीय वाढ

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
educational-materials : नवीन शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर नागपूरमधील पालकांपुढे शालेय खर्चाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तरे, बूट तसेच शाळांच्या शुल्कात झालेल्या वाढीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. महागाईमुळे मुलांचे शिक्षण आणि घरखर्च यांचा ताळमेळ कसा साधायचा, असा प्रश्न अनेक पालक उपस्थित करत आहेत.
 
 

ngp
 
 
 
- शैक्षणिक साहित्याच्या किमतीत लक्षणीय वाढ
 
 
पालकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी सुमारे एक ते बाराशे रुपयांत मिळणारा शालेय गणवेश आता दोन हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे. वह्या, पुस्तके, दप्तरे आणि इतर शैक्षणिक साहित्याच्या किमतीही लक्षणीय वाढल्या असून, काही शाळांनी शुल्कातही वाढ केली आहे. त्यामुळे शालेय खर्चाचा भार पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
 
- बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी
 
 
शाळा सुरू होण्यापूर्वी रविवार व सोमवारी महाल, इतवारी, सीताबर्डी, धरमपेठ, सक्करदरा आणि सदर येथील बाजारपेठांमध्ये पालकांनी मोठी गर्दी पाहायला मिळाली. दप्तरे, वह्या, पुस्तके आणि गणवेश खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याने काही काळ वाहतूक व्यवस्थेवरही ताण निर्माण झाला.
 
कागदाच्या वाढलेल्या दराचा परिणाम शैक्षणिक साहित्यावरही झाला असून, वह्या, पुस्तके आणि इतर साहित्याच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, यंदा पुनर्वापर केलेल्या कागदापासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक वह्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
 
काही शाळांकडून विशिष्ट दुकानांतूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी केली आहे. त्यामुळे खुल्या बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
- प्रवेशोत्सवाच्या तयारीसाठी मुलांमध्ये उत्साह
 
 
दरम्यान, शिक्षण विभागाने पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण, विद्यार्थ्यांचे औक्षण आणि 'प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा करण्याची तयारी पूर्ण केली आहे. बाजारात यंदाही 'छोटा भीम', 'बार्बी' आणि 'अॅव्हेंजर्स' थीमच्या दप्तरांसह शालेय साहित्याला मुलांकडून मोठी पसंती मिळत असून, वाढत्या खर्चातही पालकांनी मुलांच्या आनंदाला प्राधान्य दिल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळाले.