होमगार्डच्या मंडळ अधिकाऱ्याने मागितली लाच

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अनिल कांबळे
नागपूर, 
Nagpur Home Guard Bribery Case होमगार्डमध्ये पुन्हा नियुक्ती करून दिल्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नागपूर होमगार्डच्या झोन क्रमांक ५ मधील मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. लाचेची रक्कम स्वीकारण्याबाबत संशय आल्याने संबंधित अधिकाऱ्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप विजय नागपुरे असे लाचखोर होमगार्डच्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.
 
 
lach
तक्रारदार हे गेल्या सुमारे २० वर्षांपासून होमगार्ड सैनिक म्हणून कार्यरत आहेत. परेडवरील उपस्थिती कमी असल्याचे कारण देत त्यांना काही काळापूर्वी होमगार्डमधून कमी करण्यात आले होते. त्यानंतर २०२६ मध्ये त्यांना पुन्हा होमगार्डमध्ये सामावून घेण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून पुन्हा नियुक्ती मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून झोन क्रमांक ५ चे मंडळ अधिकारी प्रदीप विजय नागपुरेने तक्रारदाराला ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करत असताना आरोपीने ३० हजारांच्या लाचेची मागणी केल्याची बाब स्पष्ट झाली. यानंतर एसीबीने सोमवारी सापळा रचला. मात्र, तक्रारदाराबाबत संशय आल्याने संबंधित अधिकाऱ्याने लाचेची रक्कम प्रत्यक्ष स्वीकारली नाही. तरीही पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाल्याने नागपुरेला ताब्यात घेण्यात आले असून लकडगंज पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.