नागपूर
schools without teachers राज्यभर मंगळवार दिनांक ३० जूनपासून 'प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू असताना नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षण व्यवस्थेचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ५७ सरकारी माध्यमिक शाळा शिक्षकविहीन झाल्याने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कशी होणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
समायोजनानंतर शाळा ओस पडल्या
१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. मात्र, ज्या शाळांमधून शिक्षक हलविण्यात आले, त्या शाळांतील विद्यार्थ्यांचे अद्याप अन्य शाळांमध्ये स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये केवळ लिपिक किंवा शिपाई कार्यरत असून अध्यापनाचे काम पूर्णपणे ठप्प आहे.नागपूर ग्रामीणमधील रुई माध्यमिक शाळेत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ३५ विद्यार्थी आहेत. मात्र, सर्व शिक्षकांची बदली झाल्याने शाळा शिक्षकांविना झाली आहे. त्याचप्रमाणे खारबी रोडवरील नवमहाराष्ट्र हायस्कूलमध्ये केवळ २२ विद्यार्थी असून, एकमेव शिक्षकाचीही बदली झाल्याने तेथील वर्गही बंद पडले आहेत.
स्थलांतर रखडल्याने संभ्रम
गेल्या दोन महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये स्थलांतर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रक्रिया रखडल्याने प्रवेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षक संघाचा सवाल
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल गोठमारे यांनी, "प्रवेशोत्सवाच्या तयारीच्या सूचना दिल्या जात असताना अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. अशा परिस्थितीत प्रवेशोत्सव आणि विद्यार्थ्यांच्या बदल्यांचे नियोजन कसे होणार?" असा सवाल उपस्थित केला.जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल दहीफळे यांनी सांगितले की, कर्मचारी समायोजनामुळे ५७ शाळा शिक्षकविहीन झाल्या आहेत. काही शाळांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यावरील निर्णय प्रलंबित आहे. उर्वरित शाळांतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर शाळा सुरू झाल्यानंतर दोन ते चार दिवसांत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.