अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक! ३५ ठार

मृतकांमध्ये चिमुकल्यांचा समावेश

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
कराची, 
Pakistan air strike on Afghanistan कराचीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठी लष्करी कारवाई करत रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अफगाणिस्तानातील तीन प्रांतांवर हवाई हल्ले केले. पाकिस्तान सरकारने या कारवाईत तहरीक-ए-तालिबान (TTP) आणि जमात-उल-अहरार या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यांत दहशतवाद्यांऐवजी सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत.या हवाई हल्ल्यांमध्ये ३५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४ ते ९ वर्षे वयोगटातील लहान मुले तसेच वृद्धांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अनेक जखमींवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचे मंत्री अताउल्ला तारार यांनी या कारवाईत २५ दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला आहे.
 
 

पाकिस्तानचा 
 
भारतीय वेळेनुसार रात्री १२:३० वाजता पाकिस्तानी हवाई दलाने पक्तिका प्रांतातील ज्ञान परिसर, चमकानी आणि कुनार प्रांतातील मारवारा या भागांतील निवासी घरे आणि मशिदींना लक्ष्य केले. पहिल्या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, अवघ्या २५ मिनिटांत म्हणजेच रात्री १२:५५ वाजता पुन्हा एकदा हवाई हल्ला करण्यात आला. या दुसऱ्या हल्ल्यात मदतकार्य करणारे आणि जीव वाचवण्यासाठी धावपळ करणारे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले.हल्ल्यातून बचावलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोटावेळी परिसरात कोणतेही लष्करी जवान किंवा सरकारी अधिकारी उपस्थित नव्हते. पाकिस्तानने दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचा दावा केला असला तरी बाधित झालेले सर्वसामान्य नागरिकच असल्याचे त्याने स्पष्ट केले.
 
चमकानी भागातील एका जखमी रहिवाशाने सांगितले की, तो दुबईमध्ये मजूर म्हणून काम करत होता आणि दोन महिन्यांपूर्वीच घरी परतला होता. हवाई हल्ल्यात त्याच्या शेजारी बादशाह खान यांच्या घरावर बॉम्बहल्ला झाला. पहिल्या स्फोटानंतर शेजारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी धावले. मात्र काही मिनिटांतच दुसरा हल्ला झाल्याने मदतकार्य करणारेही या हल्ल्याचे बळी ठरले. पाकिस्तान सातत्याने आपल्या देशातील दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानला जबाबदार धरत आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पाकिस्तानने दहशतवादविरोधी कारवाईच्या नावाखाली अफगाणिस्तानवर वारंवार हवाई हल्ले केले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी दहशतवाद्यांऐवजी सामान्य नागरिकच बळी पडत असल्याचे आरोप होत आहेत. मागील ९ महिन्यांत पाकिस्तानी हवाई दलाच्या हल्ल्यांत ५६५ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.