‘आम्हीही सावित्री’तून उलगडला संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
Ramnagar VatPurnima महिला समाज, रामनगरच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त आयोजित ‘आम्हीही सावित्री’ या विशेष कार्यक्रमात समाजसेवेचा व संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या दोन आधुनिक सावित्रींच्या मनोगताने उपस्थितांना भारावून टाकले.
 
 
ramnagar
रामनगर येथील सरस्वती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. कामायनी देशपांडे (संचालक, उपाय) आणि अनघा पुरंदरे (उद्योजिका, सखी महिला बचतगट, पिटेझरी) यांची प्रकट मुलाखत पार पडली. सुप्रसिद्ध निवेदिका प्रभा देऊस्कर यांनी घेतलेल्या प्रभावी मुलाखतीतून दोघींच्याही सामाजिक कार्यातील संघर्ष, अडचणी आणि यशाचा प्रवास अत्यंत मनमोकळेपणाने उलगडला गेला. स्वतः कर्करोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. कामायनी देशपांडे गेल्या अकरा वर्षांपासून फुटपाथवरील व वंचित मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. सुरुवातीच्या काळात पालकांचा विरोध, मुलांना शाळेत न पाठविणे तसेच विविध अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. मात्र जिद्द आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली.
 
 
अनघा पुरंदरे या पुण्यातील सुखसोईचे जीवन आणि नोकरी सोडून पतीसमवेत जंगलांनी वेढलेल्या पिटेझरी गावात स्थायिक झाल्या. तेथे आदिवासी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्या विविध उपक्रम राबवीत आहेत. महिलांकडून पिशव्या, गोधड्या व अन्य हस्तकला वस्तू तयार करून त्यांची विक्री केली जाते आणि त्यातून मिळणारा मोबदला संबंधित महिलांना दिला जातो. या उपक्रमामुळे अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही मान्यवरांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा वेध प्रभा देऊस्कर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण प्रश्नोत्तरांद्वारे घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला समाजाच्या अध्यक्षा अनुराधा कुऱ्हेकर होत्या.