पराभवामागे कोण? गौतमवर ‘गंभीर’ आरोप!

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Serious allegations against Gautam गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकत मोठे यश मिळवले असले, तरी काही अनपेक्षित पराभवांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. अलीकडेच आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून आइसलँड क्रिकेटनेही उपरोधिक पोस्ट करत गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात भारताला काही निराशाजनक निकालांचा सामना करावा लागला. मायदेशात प्रथमच न्यूझीलंड विरुद्ध क्लीन स्वीप, दीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावणे आणि आता आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत पराभव, यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
 
Gautam
 
भारताच्या पराभवानंतर काही तासांतच आइसलँड क्रिकेटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली. पोस्टमध्ये उपरोधिक शैलीत म्हटले होते की, गौतम गंभीर यांना त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील करण्याचा कोणताही विचार सध्या सुरू नाही. मात्र, भारतासारख्या स्टार खेळाडूंनी भरलेल्या संघाला आयर्लंडमध्ये असे निकाल मिळवून देण्यासाठी ‘असामान्य प्रतिभेची’ गरज असल्याचेही त्यांनी टोमणेखोर शैलीत म्हटले. श्रेयस अय्यरच्या यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र, दोन्ही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. बेलफास्टमध्ये झालेला पहिला सामना भारताने ३४ धावांनी गमावला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला, पण अखेर आयर्लंडने १ धावेने विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली.
 
 
 
दोन्ही सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली, मात्र फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. कर्णधार श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसंग यांच्यासह अनेक महत्त्वाच्या फलंदाजांना मालिकेत प्रभाव टाकता आला नाही. सलग पहिले दोन टी-२० सामने गमावणारा श्रेयस अय्यर हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. आता भारतीय संघाचे लक्ष इंग्लड दौऱ्याकडे लागले आहे. या आठवड्याच्या अखेरीस संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना १ जुलै रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला जाईल. दुसरा सामना ४ जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. त्यानंतर उर्वरित सामने ७, ९ आणि ११ जुलै रोजी अनुक्रमे नॉटिंगहॅम, ब्रिस्टल आणि साउथहॅम्प्टन येथे रंगणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघ पुनरागमन करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.