नवी दिल्ली
Serious rape allegation against footballer २०२६ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान एक धक्कादायक वाद समोर आला असून केप व्हर्डे फुटबॉल संघाचा कर्णधार रायन मेंडेस गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. उत्कृष्ट कामगिरी करत केप व्हर्डेने ३२ संघांच्या फेरीत प्रवेश केला असला, तरी संघाचा स्टार खेळाडू आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. ४ जुलै रोजी अर्जेंटिनाविरुद्ध महत्त्वाचा सामना होण्यापूर्वीच या प्रकरणाने फुटबॉल विश्वात खळबळ उडवली आहे.ब्राझिलियन मीडिया रिपोर्टनुसार, मार्च २०२६ मध्ये केप व्हर्डे संघ फिफा मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. याच दौऱ्यात संघासोबत ब्राझिलियन महिला अनुवादक काम करत होती. संबंधित महिलेने आरोप केला आहे की, ऑकलंडमधील एका हॉटेलमध्ये रायन मेंडेसने जबरदस्तीने तिच्या खोलीत प्रवेश करून तिच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणानंतर स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. समोर आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, तिच्या शरीरावर अनेक जखमांचे निशाण आढळले आहेत. तसेच शरीराच्या काही भागांवर गंभीर जखमा असल्याची नोंदही करण्यात आली आहे.पीडित महिलेने केप व्हर्डे संघाशी संबंधित अधिकाऱ्यांकडेही याबाबत तक्रार केली होती. मात्र, तिच्या म्हणण्यानुसार तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सध्या न्यूझीलंड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अद्याप आरोप अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नसले तरी या घटनेने विश्वचषक स्पर्धेवर मोठी छाया पडली आहे. या प्रकरणावर फिफानेही प्रतिक्रिया दिली आहे. फिफाने स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन अत्यंत गंभीरतेने घेतले जाते. संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून तपास पूर्ण होईपर्यंत अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही. दरम्यान, केप व्हर्डे फुटबॉल असोसिएशनकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात नेमकी कोणती नवी माहिती समोर येते, याकडे संपूर्ण फुटबॉल विश्वाचे लक्ष लागले आहे.