पुणे,
Shocking details in the Siya case पुण्यातील २६ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात नवीन धक्कादायक तपशील समोर आले आहेत. या प्रकरणातील आरोपी सिया गोयलबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, पुण्याहून मुंबई विमानतळापर्यंत दोघांना घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हर वैभव जाधव यांनी तपासात मोठा दावा केला आहे. ड्रायव्हर वैभव जाधव यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई विमानतळाकडे जाताना त्यांनी सियाला गाडीतून केतन अग्रवाल यांचा पासपोर्ट घेताना पाहिले होते. विशेष म्हणजे, सर्वांना विमानतळावर सोडल्यानंतर काही वेळातच केतनचा फोन आला आणि त्याने आपला पासपोर्ट सापडत नसल्याचे सांगितले. केतनने ड्रायव्हरला पासपोर्ट गाडीत राहिला असावा, अशी शक्यता व्यक्त केली होती.

तपासादरम्यान वैभव जाधव यांनी संपूर्ण प्रवासातील घटनाक्रम उघड केला. सिया आणि केतन हे प्री-वेडिंग शूटसाठी बाली येथे जाणार होते. यासाठी पुण्यातून मुंबई विमानतळापर्यंत खासगी गाडी बुक करण्यात आली होती. मात्र, प्रवास सुरू होण्यापूर्वीच सिया बालीला जाण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले होते. तिने गाडीत बसण्यासही नकार दिला होता. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की, सियाचा भाऊ साहिलने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने गाडीत बसवल्याचा दावा ड्रायव्हरने केला आहे. प्रवासादरम्यान पुणे ते रावेत या दरम्यान सिया आणि साहिल यांच्यात जोरदार वाद झाल्याचेही समोर आले आहे.
यानंतर सिया, साहिल, केतन आणि केतनच्या कुटुंबातील काही सदस्य मुंबईकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान ते चहा-नाश्त्यासाठी एका फूड कोर्टवर थांबले. याच ठिकाणी सियाने काहीतरी कारण सांगून गाडीजवळ येत गाडीतून काही वस्तू घेतल्या आणि त्या आपल्या खिशात ठेवल्याचे ड्रायव्हरने पाहिले. मुंबई विमानतळावर सर्वांना सोडल्यानंतर थोड्याच वेळात केतनने ड्रायव्हरशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने आपले काही सामान गाडीत राहिल्याचे सांगितले. विशेषतः पासपोर्ट सापडत नसल्याने तो चिंतेत होता. मात्र, ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार त्याने आधीच सियाला गाडीतून वस्तू घेताना पाहिले होते आणि त्यात केतनचा पासपोर्टही असल्याचा त्याला संशय होता. या नव्या खुलाशामुळे केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, तपास यंत्रणा आता या सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहे.