अर्जुनी मोरगाव,
layakram-bhendarkar : तालुक्यातील इंजोरी येथे स्वराज महिला प्रभाग संघ, बोंडगाव देवीच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित महिला बचत गटांच्या सदस्यांना मार्गदर्शन करत महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ घेण्याचे आवाहन केले.

या सभेला परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्य उपस्थित होत्या सभेत संघाच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले तसेच आगामी वर्षातील नियोजन, उद्दिष्टे आणि महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रसंगी जि. प. अध्यक्ष भेंडारकर यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे सांगून महिलांनी केवळ बचत गटांच्या कार्यापुरते मर्यादित न राहता लघुउद्योग, गृहउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, प्रक्रिया उद्योग, हस्तकला तसेच स्थानिक गरजांवर आधारित विविध उद्योग सुरू करून स्वतःचे उत्पन्न वाढवावे. शासनाच्या विविध योजनांची अचूक माहिती घेऊन त्यांचा लाभ मिळविल्यास महिलांच्या आर्थिक उन्नतीला मोठी चालना मिळू शकते, असे सांगितले.
तसेच नियमित बचत, आर्थिक शिस्त, बँक व्यवहारांमधील पारदर्शकता, कर्जाचा योग्य व उत्पादक वापर आणि वेळेवर परतफेड यामुळे बचत गटांची विश्वासार्हता वाढून आर्थिक प्रगतीचा मार्ग अधिक सक्षम होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित महिलांना उमेद अभियानांतर्गत उपलब्ध होणार्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पं. स. उपसभापती संदीप कापगते, पं. स. सदस्या कुंदा लोगडे, जिल्हा व्यवस्थापक (उमेद) नरेंद्र रहांगडाले, स्वराज महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा शुभांगी झोळे, माजी उपसरपंच काशिनाथ कापसे, पोलिस पाटील डाकराम मेंढे, सहाय्यक शिक्षक लाखेश्वर लंजे, वनिता मेश्राम, पोलिस पाटील संगीता भेंडारकर (बोरटोला), रेखा डडमल, सुष्मा भेंडारकर, संगीता तरोणे, ममता सयाम, यमुताई राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संगीता गायकवाड आणि आभार प्रदर्शन मोक्षलता ब्राह्मणकर यांनी केले.