तेहरान,
US-Iran tension eased अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव सध्या काहीसा निवळल्याचे चित्र आहे. दोन्ही देशांनी पुन्हा एकदा परस्परांवरील हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली असून, शांतता करार टिकवण्यासाठी या आठवड्यात कतारची राजधानी दोहा येथे उच्चस्तरीय बैठक होणार आहे. मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. वॉशिंग्टन आणि तेहरान यांनी अंतरिम युद्धविराम जाहीर केल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत ही महत्त्वाची घडामोड घडत आहे. अलीकडील लष्करी संघर्षामुळे हा करार कोलमडण्याची भीती निर्माण झाली होती. या संपूर्ण करारातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी हा व्यापारी जलमार्ग. सुरुवातीच्या करारानुसार, इराणने या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या बदल्यात अमेरिकेने इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी हटवण्यास सहमती दर्शवली होती. गेल्या आठवड्यात स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या बैठकीत अमेरिकन सैन्य आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स यांच्यात थेट लष्करी हॉटलाइन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

दरम्यान, इराणने जलमार्गातून जाणाऱ्या सर्व जहाजांनी थेट इराणी अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा अशी मागणी केली. अमेरिकेने हा प्रस्ताव मूळ कराराचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली.युद्धविरामापूर्वी दोन्ही देशांमध्ये जोरदार लष्करी संघर्ष झाला होता. होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्र, ड्रोन पायाभूत सुविधा आणि किनारी रडार केंद्रांवर हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणला करार पाळण्याची संधी देण्यात आली होती, मात्र त्यांनी अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. प्रत्युत्तरादाखल इराणच्या आयआरजीसीने कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. कुवेतने हवेतच दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाडल्याची माहिती दिली, तर बहरीनमध्ये किरकोळ नुकसान झाल्याचे समोर आले. सुदैवाने अमेरिकेच्या लष्कराची कोणतीही जीवितहानी झाली नाही.या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून इराणला कडक इशारा दिला. ट्रम्प यांनी म्हटले की, जर परिस्थिती बिघडली तर अमेरिका लष्करी कारवाई पूर्ण क्षमतेने पुढे नेईल आणि त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागू शकतात.