अनिल कांबळे,
नागपूर,
vishwas-nangre-patil : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच जनतेच्या सेवेसाठी मी कटिबद्ध आहे. कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी आणि कायदा हातात घेणाऱ्यांना चांगला धडा शिकविण्यासाठी मी तत्पर आहे. मुली, तरुणी, महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेला प्राथमिकता देणार असून ते आमचे आद्य कर्तव्य आहे, अशा शब्दांत नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. मावळते पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्याकडून नांगरे पाटील यांनी पोलीस मुख्यालयात सोमवारी औपचारिक पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी गृहशहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी नागपूरला नियुक्ती देऊन जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवण्यास प्राधान्य असेल. त्यामुळे आता कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारांचा बिमोड करण्यावर भर दिल्या जाईल. शहरातील प्रत्येक नागरिकाला पोलिस नाव उच्चारताच एक विश्वास वाटला पाहीजे, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पोलिसांची प्रतिमा उजाळण्यासाठी पोलिस ठाण्यात प्रत्येकाला सौजन्याची वागणूक मिळेल, याची खात्री देत आहे, असेही नांगरे पाटील यावेळी म्हणाले. खांद्यावरचे ‘आयपीएस’ फक्त मिरवण्यासाठी नाही, तर जनसेवेशी बांधील आहे. मानवी मूल्ये आणि संविधानाशी माझी कटिबद्धता आहे. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्यांना सायबर संदर्भात मार्गदर्शनात करण्यात येईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मुंबईत १०० निर्भया पथके तयार केली होती. त्याच धर्तीवर नागपुरातही अभियान राबवले जाईल. रात्रीची गस्तीला प्राधान्य देणार असून शहरातील प्रत्येक परिसर मी पिंजून काढणार आहे, असेही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.
ड्रग्ज तस्कारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’
सध्या नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’ सुरु असून आता या अभियानात कठोर कारवाईचा धडाका लावण्यात येईल. जेणेकरुन तरुणांना अंमली पदार्थांपासून लांब ठेवण्यास मदत होईल. ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून तस्करांवर कारवाई करण्यात येईल. अंमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास किंवा कुणी मदत केल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल.
गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण करणार
शहरात फक्त पोलिसांचाच वचक असायलाच हवा, गुन्हेगारांनी तोंड वर काढताच त्यांच्यावर तत्काळ आवर घालण्यात येईल. प्रत्येक पोलिस कर्मचारी हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. पोलिसांशी वाद किंवा शासकीय कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांचा योग्यपणे ‘हिशोब’ करण्यात येईल. त्यांच्याशी होणारा अभद्र व्यवहार खपवून घेणार नाही. त्यामुळे आता शहरात फक्त कायद्याचेच राज्य राहणार आहे, असे पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावले.