वर्धा,
wardha nagar parishad, वाढीव मालमत्ता कर कमी करून ज्यांनी वाढीव कराकरिता आक्षेप नोंदविला नाही, त्यांना आक्षेप नोंदविण्याची मुभा देण्यात यावी तसेच सर्व आक्षेपाची रितसर शहानिशा झाल्यावरच वाढीव कर कमी करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांनी शिष्ठमंडळासह नगराध्यक्ष सुधीर पांगूळ व मुख्याधिकारी विजय देशमुख यांची भेट घेऊन निवेदन देवून केली.
नगर परिषद हद्दीतील मालमत्ता कर, पूर्ण मूल्यांकन व कर आकारणी संदर्भात नगर परिषद प्रशासनाकडून २०२३-२४ मध्ये प्रशासकीय कालावधीत घर भेटी व सर्वेक्षण करून कर मुल्याच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यावेळी वाढीव व अवाजवी कर आकारणी बाबत शहरात तीव्र जन आक्रोश निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने कर आकारणीवर स्थगिती दिली होती. लोक प्रतिनिधींनी नगर परिषद अअस्तित्वात आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमीका जाहीर करण्यात आली होती. नगर परिषदमध्ये ३० हजारांपेक्षा अधिक मालमत्ता करधारक आहेत. त्या काळात केवळ ७ हजार ४२ लोकांनीच कर वाढीवर आक्षेप नोंदविला होता. कर वाढीवर स्थगिती मिळाल्यामुळे उर्वरीत अंदाजे २३ हजार लोकांनी आक्षेप नोंदविला नाही. सध्या नगर परिषदमध्ये ज्यांनी आक्षेप नोंदविला, त्यांचेच म्हणने ऐकूण घेण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित २३ हजार मालमत्ताधारकांवर अन्याय होईल. अनेकांचा वार्षीक कर ४ हजारांवरून १४ हजार किंवा त्याहुन अधिक होण्याची शक्यता आहे.
यावेळी संबंधीत विषय येणार्या नगर परिषदेच्या जनरल मीटिंगमध्ये ठेवून आक्षेप न घेतलेल्या घर मालकांना संधी देण्याबाबत विचार विनिमय करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष सुधीर पांगूळ व मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी शिष्ठमंडळाला दिले.