एसटी तोट्यात तर नोकरी धोक्यात!

कामचुकार अधिकाऱ्यांना थेट कारवाईचा इशारा

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Warning of action issued to ST officials महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ढासळत्या आर्थिक स्थितीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. उत्पन्न वाढवण्यात अपयशी ठरणाऱ्या आणि कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना एका महिन्याचा अल्टिमेटम देत, कामगिरीत सुधारणा न झाल्यास बदली, पदावनती किंवा निलंबनाची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.एसटी ही ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असल्याने, केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम दिसणे आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. बैठकांपुरते काम न ठेवता उत्पन्नवाढीसाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
 
 

officers 
 
एप्रिल-मे या महत्त्वाच्या हंगामात भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न वाढ न झाल्याने मंत्री सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साधारणतः या कालावधीत एसटीला मोठा नफा मिळतो, मात्र यंदा परिस्थिती उलट असल्याचे समोर आले आहे.राज्यातील ३१ एसटी विभागांपैकी तब्बल २१ विभाग सध्या तोट्यात असल्याची माहिती समोर आली आहे. गर्दीच्या काळातही तोटा होत असल्याने महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक आगार, विभाग आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाणार आहे. उत्पन्न घटण्याची कारणे, प्रवासी संख्या कमी होण्याची कारणमीमांसा याचा सखोल अभ्यास केला जाईल. एका महिन्यानंतर कामगिरीचा आढावा घेऊन निष्काळजी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, बस फेऱ्यांचे योग्य नियोजन, वेळेवर सेवा आणि प्रवाशांना चांगली सुविधा देण्यावर भर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत एसटी मागे पडू नये यासाठी कार्यक्षम व्यवस्थापनाची गरज असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी अधोरेखित केले आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आणि आगार व्यवस्थापनात मोठी हालचाल सुरू झाली असून, पुढील काही आठवड्यांत कामगिरी सुधारण्यासाठी प्रशासनाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.