विधी शर्मा
नागपूर,
Women Health Awarenessविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही मासिक पाळी हा विषय समाजातील अनेक स्तरांमध्ये अजूनही संकोच आणि गैरसमजांच्या चौकटीत अडकलेला आहे. महिलांना आणि किशोरवयीन मुलींना दर महिन्याला मासिक पाळीचा अनुभव येत असला, तरी त्यासंदर्भातील स्वच्छता, आरोग्य आणि आवश्यक काळजी याविषयी उघडपणे चर्चा करण्यास आजही अनेकजणी कचरतात. परिणामी संसर्ग, रक्तक्षय आणि इतर आरोग्यविषयक गुंतागुंत वाढण्याचा धोका असल्याचा इशारा स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
जागतिक मासिक पाळी स्वच्छता जागृती सप्ताह' विशेष
विशेष म्हणजे, ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता जागृती सप्ताह’ साजरा होत असतानाही अनेक भागांमध्ये या विषयीची जागरूकता अपुरी असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी मासिक पाळीदरम्यान महिलांच्या हालचालींवर सामाजिक आणि धार्मिक बंधने घालण्याची प्रथा अजूनही कायम आहे. स्वयंपाकघरात प्रवेश, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग किंवा इतर सामाजिक उपक्रमांपासून महिलांना दूर ठेवण्याच्या प्रथा अद्यापही काही समाजघटकांमध्ये आढळतात.
आरोग्य विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्था Women Health Awareness जागृतीसाठी प्रयत्नशील असल्या, तरी जागृतीचा अभाव केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित नसून शहरी भागातही दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शालेय स्तरावर मासिक पाळीविषयी आरोग्य शिक्षण, समुपदेशन आणि स्वच्छतेबाबत योग्य मार्गदर्शन देण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अलका पाटणकर यांनी सांगितले की, अस्वच्छ कापडाचा वापर, सॅनिटरी पॅड वेळेवर न बदलणे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात किशोरवयीन मुलींना योग्य व वैज्ञानिक माहिती मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.तर प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शेफाली चव्हाण यांनी खाज सुटणे, वारंवार होणारा श्वेतस्राव किंवा तीव्र वेदना यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला दिला. ही लक्षणे गंभीर संसर्ग किंवा इतर स्त्रीरोगांची संकेत असू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीदरम्यान वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सॅनिटरी पॅड नियमित अंतराने बदलणे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे आणि खाज, श्वेतस्राव किंवा तीव्र वेदना यांसारखी असामान्य लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच किशोरवयीन मुलींना मासिक पाळीविषयी योग्य आणि वैज्ञानिक आरोग्य शिक्षण मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
चिंतेच्या बाबी
१. मासिक पाळीविषयी उघडपणे बोलण्यास संकोच
२. स्वच्छतेच्या अभावामुळे संसर्गाचा धोका
३. अनेक भागांत अजूनही सामाजिक बंधने कायम
४. शाळांमध्ये आरोग्य शिक्षण आणि समुपदेशनाची गरज
५. ‘मौन नव्हे, जागरूकता हवी’
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून तिच्याविषयीचे गैरसमज दूर करणे, स्वच्छतेच्या सवयी रुजवणे आणि महिलांना योग्य आरोग्यविषयक माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.