तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
akash-kamble : जिद्द, ध्येय व अथक परिश्रमाच्या बळावर एका युवकाने यशाला आकाश गवसणी घातली आहे. त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. त्याने मिळवलेल्या या यशामुळे तो अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
आकाश विजय कांबळे असे त्या युवकाचे नाव आहे. तो पुसद तालुक्यातील मधुकरनगर येथील रहिवासी आहे. आकाश अत्यंत कठीण परिस्थितीत आई-वडिलांच्या आधाराशिवाय स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर पाटबंधारे विभागात नुकताच रूजू झाला आहे.
लहानपणीच आकाशच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वप्रथम वडिलांचे निधन झाले. काही दिवसानंतर आईचाही मृत्यू झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर आकाश व त्याचा भाऊ सचिन हे दोघेही आधाराविना राहत असल्यामेळे त्यांच्या आजींनी या दोघा भावांचा काही काळ सांभाळ केला.
मात्र अत्यंत गरीबी आणि वाढत्या अडचणींमुळे आजींनी पाचव्या वर्षी आकाशला धुंदी येथील आश्रमशाळेत दाखल केले. काही काळानंतर आजींचेही निधन झाले. अशा परिस्थितीत लहान वयातच आई-वडील व आजीचा आधार हरवलेल्या आकाशने संघर्ष करत स्वतःला घडवले.
धुंदी येथील विद्यारतन वडते बालगृह आश्रमशाळेत राहून आकाशने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळवून त्याने गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयातून बीएसडब्ल्यू व एमएसडब्ल्यू या पदव्या प्राप्त केल्या.
शिक्षणासाठी आकाशने विविध ठिकाणी मिळेल ती कामे केली. कधी हॉटेलमध्ये, तर कधी मिस्त्रीच्या हाताखाली मजुरी केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आकाशने शिक्षणाची वाट सोडली नाही. विशेष म्हणजे इतक्या अडचणी असूनही आकाश कोणत्याही वाईट मार्गाला किंवा व्यसनांच्या आहारी गेला नाहीत. दिवसा काम व रात्री अभ्यास असा त्यांचा दैनंदिन दिनक्रम कायम होता.
कोरोना काळात उपासमारी, आर्थिक संकटे व इतर अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही आकाशने आत्मविश्वास न गमावता, स्वतःवर विश्वास ठेवून शिक्षण पूर्ण केले. दोन महिन्यांपूर्वी आकाश विजय कांबळे याची लातूर पाटबंधारे पाटबंधारे उपविभाग निलंगा येथे दप्तर कारकून पदावर निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिस्थिती गरीब, पण स्वप्नं श्रीमंत
एका अनाथ मुलाने स्वतःच्या हिंमतीवर आयुष्य उभे करत संघर्षावर मात केली, ही बाब प्रेरणादायी आहे. परिस्थिती गरीब होती, पण स्वप्न श्रीमंत होती, हे वाक्य आकाशच्या जीवनप्रवासाला समर्पक ठरते. आकाशचा लहान भाऊ सचिनही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पदवी शिक्षण पूर्ण करत आहे.